‘रस्ता सुरक्षा’ ही चळवळ समजून सर्वांनी सहभाग घ्यावा ः खान 32 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा कोपरगाव येथे शानदार प्रारंभ

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
रस्ता सुरक्षा सप्ताहापेक्षा रस्ता सुरक्षा चळवळ असावी आणि त्यात सर्वांनी सहभाग घेतला तर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होवून अनेकांचे प्राण वाचतील असा विश्वास श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अश्पाक खान यांनी व्यक्त केला.
![]()
कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन कार्यालयात बुधवारी (ता.20) 32 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी असलेल्या श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन मुख्यालयात होते. मात्र यावर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभाचा मान कोपरगावला आहे. याप्रसंगी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, शहराचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, बसस्थानक आगार प्रमुख अभिजीत चौधरी, मोटार वाहन निरीक्षक शाहिद सय्यद, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे, नीलेश डहाणके, उद्योजक संदीप शिरोडे, अक्षय काळे, दत्तात्रय वायखिंडे, केशव होन, धरमचंद बागरेचा, संतोष आहेर आदिंच्या उपस्थितीत वाहनांना स्टीकर लावून रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना अधिकारी खान म्हणाले, रस्ता सुरक्षा सप्ताह मोहिमेमुळे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा 35 टक्के कमी झाले असून येत्या 5 वर्षांत ते 50 टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाचे आहे. विविध प्रकारे जनजागृती करून नागरीकांना प्रबोधन करणार आहे. रस्ते अपघाताला वाहनचालक जितका जबाबदार आहे तितकेच सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात रस्ते तयार करणारे सर्वच विभाग जबाबदार आहेत. चांगल्या प्रतीचे रस्ते नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्याला समृद्धी महामार्ग जोडल्याने येत्या काळात कोपरगावच्या नागरिकांची समृद्धी होणार आहे. सर्वाधिक वाहने येथील नागरिक घेतील. रस्ता अपघातांची तीव्रता नागरिकांना समजावी, नियमांचे पालन केले तर रस्त्यावर होणारे अपघात टळून अनेकांचे प्राण वाचतील म्हणून येथून रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ केला आहे. सध्या शिकलेल्या व्यक्तींना वाहन चालविण्याचे नियम शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगून सर्वांनी वाहन चालविण्याचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक दौलत जाधव म्हणाले, प्रत्येकाचे जीवन अनमोल आहे. वाहने चालवताना काही क्षणाच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण अपघातात गेले. यामुळे अनेकांची कुटुंबे उघड्यावर पडली. त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते, पण ती माणसाची किंमत ठरत नाही. दरवर्षी देशात दीड लाख व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. म्हणून नागरिकांनी वाहने चालवताना स्वतःसाठी रस्त्यावर नियमांचे पालन करावे आणि रात्रीचा प्रवास टाळावा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सुवर्णा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संतोष आहेर, जय आनंद मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे सुभाष लोढा, जय जनार्दन मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे किरण मवाळ, दक्षता मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे नागेश दवंगे, साई टीव्हीएस, श्रध्दा होंडा, शिरोडे बजाज व उपप्रादेशिक परिवहन श्रीरामपूर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करून उपस्थित वाहनचालक, वाहनमालक, नवीन शिकाऊंसाठी मोटार वाहन कायदा व रस्ता सुरक्षेचे नियम समजण्यासाठी प्रबोधनपर भिंती पत्रके, सूचना फलके लावण्यात आली होती. तर सविस्तर माहिती असणारी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिका देण्यात आली. अर्चना फटांगरे यांनी रस्ता सुरक्षेची शपथ देऊन प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले तर केशव होन यांनी आभार मानले. सदर 32 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी किरण होन, दीपक कचेरीया, इब्राहिम सय्यद, योगेश हंडोरे, पंकज जाधव, संजय वायखिंडे, शकील पटेल, बाबू शेख, शहानवाज खान, पंकज अग्रवाल, महेश पेटकर, विकास घुगरी, योगेश पंचमेढे, विविध गाड्यांचे विक्रेते, आरटीओ प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.
