जिल्ह्यात साडेतीन महिन्यातील सर्वाधिक निचांकी रुग्णसंख्या! संगमनेर शहरातही सलग दुसर्या दिवशी अवघे पाच रुग्ण; तर तालुक्यातील संक्रमणही नियंत्रणात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याला दिलासा देणार्या कोविड रुग्णसंख्येने आज साडेतीन महिन्यातील सर्वाधीक निचांकी 235 रुग्णसंख्या गाठीत जिल्हावासीयांना सुखद् धक्का दिला आहे. यापूर्वी 9 मार्च रोजी जिल्ह्यात 229 रुग्ण आढळले होते, त्यानंतर दुसर्या लाटेचा प्रभाव वाढत गेल्याने जिल्ह्याची अवस्था गंभीर झाली होती. त्यासोबतच मागील चार दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्याही तिशीच्या आंत असून आजही शहरातील अवघ्या पाच जणांसह तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 890 झाली आहे.
राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. मात्र त्याच वेळी नव्याने येवू घातलेल्या डेल्टा प्लस या महाभयानक विषाणूंचे संभाव्य संकट येवून उभे राहील्याने आजपासून राज्यात तृतीय श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे कोविडचे दुसरे संक्रमण आटोक्यात येत असल्याचा आनंद तर दुसरीकडे नव्याने भीती दाखवणारा डेल्टा प्लस विषाणू अशी सध्याची अवस्था निर्माण झाली आहे. डेल्टा प्लस विषाणूंचा संसर्ग दोन्ही लस घेतलेल्यांसह यापूर्वी कोविड झालेल्यांनाही होत असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून वारंवार समोर आल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले असून जिल्ह्यात डेल्टा प्लसचे संक्रमण झालेला एकही रुग्ण नसतांनाही जिल्ह्याला निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.
आज खासगी प्रयोगशाळेच्या सोळा व रॅपिड अँटीजेनच्या सात चाचण्यांमधून संगमनेर शहरातील पाच जणांसह ग्रामीण भागातील अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील संगमनेर असा उल्लेख असलेल्या 44 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, 31 व 30 वर्षीय महिला व चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे. तर ग्रामीणभागातील कौठे धांदरफळ येथील 39 वर्षीय तरुण, खरशिंदे येथील 36 वर्षीय तरुण, निमज येथील 45 वर्षीय महिला, मनोली येथील 43 वर्षीय महिला, शेळकेवाडी येथील 50 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण व 34 वर्षीय महिला, कनोली येथील 40 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 58 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 34 वर्षीय महिलेसह आठ वर्षीय मुलगा, दाढ बु. येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला, कर्जुले पठार येथील 24 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय तरुणी व आश्वी बु. मधील 76 वर्षीय महिलेसह 59 वर्षीय इसम अशा तालुक्यातील एकूण 23 जणांना कोविडची लागण झाली आहे.
गेल्या 9 मार्चनंतर जिल्ह्याला आज सगळ्यात मोठा दिलासा मिळाला. शासकीय प्रयोगशाळेचे पाच, खासगी प्रयोगशाळेचे 70 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातील 160 अहवालातून जिल्ह्यातील 235 जणांना संक्रमण झाल्याचे आज समोर आले. त्यात पारनेर 36, श्रीगोंदा 30, अकोले 24, संगमनेर 23, जामखेड 19, राहुरी व श्रीरामपूर प्रत्येकी 17, पाथर्डी 14, नेवासा व शेवगाव प्रत्येकी 11, राहाता 10, कोपरगाव 8, नगर ग्रामीण सात, कर्जत सहा व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील तिघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 79 हजार 89 झाली आहे.