‘मातोश्री’च्या निर्णयानंतर भूमिका जाहीर करणार! माजी मंत्री बबनराव घोलप; पक्षप्रमुखांच्या दौर्‍याबाबत अंधारात ठेवण्यात आले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडाळीने ‘मातोश्री’ अस्वस्थ झाली होती. सर्वत्र अंधार पसरल्यासारखे चित्र असतानाही सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बांधलेले कट्टर शिवसैनिक हातात दिवट्या घेवून उभे होते, त्यात माझाही समावेश होता. त्याचवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा करुन शिर्डी की अमरावती असा प्रस्ताव देत माझ्याच विनंतीवरुन शिर्डीत लोकसभेची तयारी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पक्षाने शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविली. त्यानुसार आपण पक्षात नव्याने प्राण फुंकून मतदारसंघाची पुनर्बांधणी केली. मात्र अचानक भाऊसाहेब वाकचौरेंचा पक्षप्रवेश आणि पक्षप्रमुखांच्या शिर्डी दौर्‍याबाबत खुद्द संपर्कप्रमुखालाच अंधारात ठेवण्याच्या प्रकाराने आपणास खोलवर वेदना झाल्याने आपण उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यावर सोमवारी मातोश्रीवरही जावून आलो असून दोन दिवसांत पक्षाने भूमिका कळवावी अशी विनंती आपण केली आहे. त्यानंतरच आपली भूमिका जाहीर करु असे वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दैनिक नायकशी बोलताना केले आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात संगमनेर, कोपरगाव व राहाता तालुक्यातील दुष्काळीभागांना भेटी देत बळीराजाशी संवाद साधला. या दौर्‍यात शिर्डीचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप सहभागी असले तरीही कोणत्याही छायाचित्रात त्यांची छबी दिसली नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असतानाच त्याच्या दुसर्‍याच दिवशी शनिवारी (ता.९) शिवसेनेच्या परंपरेनुसार सामना दैनिकातून नावे जाहीर करीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदावरुन घोलप यांची उचलबांगडी करण्यात आली. ठाकरेंच्या दौर्‍याबाबत अंधारात ठेवण्याचा प्रकार आणि त्यानंतर लागलीच संपर्कप्रमुख पदावर आलेल्या गडांतराने नाराज झालेल्या बबनराव घोलप यांनी त्याच दिवशी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवला.

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जुन्या आणि जाणत्या शिवसैनिकांमध्ये स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर जावून आपली निष्ठा सिद्ध केली. त्यावेळी प्रत्येकाकडेच संशयाच्या नजरेतून बघावे अशी परिस्थिती असतानाही घोलपांसारख्या निष्ठावानांच्या बळावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाहूंमध्ये पुन्हा बळ संचारले. यावेळी ठाकरे यांनी घोलप यांच्याशी चर्चा करुन त्यांच्यासमोर अमरावती व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रस्ताव ठेवले. आजपासूनच कामाला लागा आणि विजयश्री मिळवूनच मातोश्रीवर परत या असा आदेशच त्यांनी दिला. त्यावर २००९ पासूनच शिर्डी लोकसभा लढवण्याची तयारी करणार्‍या घोलप यांनी शिर्डीची निवड करीत मातोश्री सोडली.

त्यानंतरच्या अकरा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शिर्डी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, अकोले अशा सगळ्याच तालुक्यांमध्ये भेटीगाठी सुरु करुन अडगळीत गेलेल्या शिवसैनिकांना जागे करुन पुन्हा प्रवाहात आणायला सुरुवात केली. त्यातूनच बहुतेक पदाधिकारी वर्षानुवर्ष पदाला चिकटून बसल्याने पक्षात मरगळ आल्याचेही वेळोवेळी दिसून आल्याने त्यांनी पक्षाशी चर्चा करुन शिर्डी लोकसभा मतदार संघातील पदाधिकार्‍यांच्या वतनदार्‍या संपुष्टात आणून नवीन चेहर्‍यांना संधी दिली. घोलप यांच्यावर शिर्डीची जबाबदारी येण्यापूर्वी या मतदारसंघातील पक्षाचे बहुतेक पदाधिकारी साखरसम्राटांच्या दावणीला बांधलेले असल्याचेही ठळकपणे समोर आले. अशांना बाजूला सारले गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

या दरम्यान पक्षाने संपर्कप्रमुख पदाचीही जबाबदारी दिल्याने पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पक्षप्रमुखांशी वारंवार संवाद साधून जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, साखर कारखाना आदी निवडणुकांमध्येही सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. शिर्डी मतदारसंघात आजवर कधीही सामान्य शिवसैनिक बाजार समितीचा सदस्य होवू शकला नव्हता, मात्र आपण या परिस्थितीत बदल घडवून आणला. जुन्या शिवसैनिकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाल्यानेे त्यांची सक्रियताही पक्षाला फायदेशीर ठरेल अशी स्थिती निर्माण झाली. मात्र काहींच्या अंतर्गत राजकारणातून गेल्या महिन्यात सामान्य शिवसैनिकांमध्ये गद्दार म्हणून ओळख असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी पक्षाने दारे उघडली. याबाबत ना संपर्कप्रमुखाचे मत विचारले गेले, ना पदाधिकारी व सामान्य शिवसैनिकाचे.

त्यामुळे वाकचौरे यांचे नाव चर्चेत आल्यापासून मतदारसंघातील कार्यकर्त्यांमधूनच त्याला विरोध होवू लागला. त्यातच पक्षाने आपल्याला दोन मतदार संघांचा प्रस्ताव देत एकाची निवड करण्यास सांगूनही उमेदवार आयात करण्याचा हा प्रकार आपणासही टोचला, मात्र निष्ठा आडवी आल्याने आपण तो सहन केल्याचे घोलप सांगतात. मात्र गेल्या शुक्रवारी (ता.८) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा दौर्‍याबाबत जेव्हा आपणास पूर्णतः अंधारात ठेवण्यात आले, तेव्हा मात्र मनात प्रचंड वेदना झाल्या आणि आपण पदांचे राजीनामे देवून सामान्य शिवसैनिकाप्रमाणेच वावरावे असे ठरवून उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे घोलप यांनी दैनिक नायकशी बोलताना सांगितले.

शनिवारी (ता.९) मातोश्रीवर राजीनामा पाठविल्यानंतर आपल्याशी संपर्क साधण्यात आला व सोमवारी (ता.११) खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आपण मुंबईत जावून राऊत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत घोलप यांनी शिर्डी लोकसभेची उमेदवारी, शिर्डीचे संपर्कप्रमुखपद व पक्षाचे उपनेतेपद कायम ठेवण्याची अट घातली आहे. पक्षाने दोन दिवसांत आपल्या प्रस्तावरील निर्णय कळवावा अशी विनंतीही त्यांनी राऊत यांच्याकडे बोलून दाखवली. त्यानुसार पक्षप्रमुखांशी चर्चा करुन कळवतो असा त्यांचा प्रतिसाद होता. दोन दिवसांत पक्ष काय निर्णय घेतो त्यावरच आपण आपली भूमिका ठरवू असेही बबनराव घोलप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेत निर्माण झालेला संभ्रम आजही कायम असून पुढील दोन दिवसांत त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री बबनराव घोलप नाशिकच्या देवळालीचे असून पाचवेळा ते तेथून विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. याशिवाय १९९५ साली भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्रीपदही भूषविले आहे. गेल्या साडेपाच दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या बबनराव घोलप यांना मानणारा मोठा वर्ग शिर्डी लोकसभा मतदारसंघात असून त्यांची वेगळी भूमिका गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ हिरावून घेणारीही ठरु शकते. त्यामुळे त्यांच्या ‘अल्टिमेटमवर’ पक्ष काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *