संगमनेरच्या न्यायालयाकडून निवृत्ती महाराज इंदुरीकरांना जामीन मंजूर! माध्यमांच्या हातावर ‘तुरी’ ठेवण्याची खेळी; एक दिवस आधीच न्यायालयासमोर हजेरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पूत्रप्राप्ती बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणार्‍या (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी दोनवेळा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समंस बजावण्यात आले होते. मात्र दोन्हीवेळा ते हजर राहीले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी (ता.24) होणार्‍या तिसर्‍या सुनावणीवेळी ते गैरहजर राहील्यास त्यांच्या नावाने अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या तारखेकडे संपूर्ण राज्यातील माध्यमांचे लक्ष खिळले होते. मात्र या सर्वांच्या हातावर ‘तुरी’ ठेवून त्यांनी सुनावणीच्या एक दिवस अगोदरच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजेरी लावून आपली जामीनावर मुक्तता करुन घेतली.


ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय असलेले कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख तथा इंदुरीकर महाराज यांनी पूत्रप्राप्तीचे सूत्र सांगतांना सम आणि विषम तारखांचे गणितं सांगून वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड.रंजना पगार-गंवादे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशावरुन घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक डॉ.भास्कर भंवर यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व लिंग निवडीस प्रतिबंध करणार्‍या (पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे 19 जून 2020 रोजी गुन्हा दाखल केला.


इंदुरीकर महाराज यांनी त्या विरोधात संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा न्यायालयात अपिल केले असता न्यायालयाने त्यांचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. अ‍ॅड.रंजना पगार-गवांदे यांनी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला. त्याविरोधात इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर राहणे क्रमप्राप्त होते.


या प्रकरणात संगमनेरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.वाघमारे यांच्यासमोर दोनवेळा सुनावणी ठेवण्यात आली. मात्र दोन्हीवेळा इंदुरीकर महाराज गैरहजर राहीले. उद्या (ता.24) तिसर्‍यांदा सुनावणी होणार होती. संपूर्ण राज्याचे आणि माध्यमांचे लक्ष वेधलेल्या या प्रकरणात या दोन्ही सुनावण्यांच्या वेळी राज्यभरातील माध्यमांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली. मात्र महाराज आलेच नाहीत, आता शुक्रवारच्या सुनावणीलाही ते गैरहजर राहीले तर न्यायालयाकडून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यातील माध्यमांसह नागरीकांचेही लक्ष लागून होते.


मात्र या सर्वांना अक्षरशः ‘चकवा’ देत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी विधीज्ञ के.डी.धुमाळ यांच्या मार्फत संगमनेरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.वाघमारे यांच्यासमोर सकाळी 11 वाजता जामीनासाठीचा अर्ज दाखल केला. दुपारी साडेबाराच्या सुमारास खुद्द इंदुरीकर महाराज न्यायालयासमोर नतमस्तक झाले. कीर्तनाच्या तारखा वर्ष-वर्ष आधी घेतलेल्या असतात, त्यामुळे ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याने आयोजकांचे नुकसान होते असा युक्तिवाद त्यांच्यामार्फत करण्यात आल्याचे समजते. यानंतर न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केली. जवळपास अर्धातास न्यायालयात घालवूनही त्याची भणक माध्यमांच्या प्रतिनिधींना लागली नाही.

न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी आलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर जवळपास दीडतास न्यायालयाच्या आवारात होते. साडेबाराच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.वाघमारे यांच्यासमोर हजर करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयातील कर्मचारी व वकिलांनी इंदुकरीकरांची चांगलीच बडदास्त ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. इतकावेळ न्यायालयात असूनही पत्रकारांना त्याचा सुगावा लागला नाही, यावरुनही यासर्व गोष्टीचा सहज उलगडा होतो. एकंदरीत पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत गुन्ह्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना जामीन मंजूर झाला आहे, यानंतर आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन खटला सुरु राहील व त्यांचे वकिल परस्परांशी युक्तिवाद करतील.

Visits: 3 Today: 1 Total: 29514

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *