वाढीव पाणीपट्टी व कर पूर्णपणे रद्द करा ः जगताप
वाढीव पाणीपट्टी व कर पूर्णपणे रद्द करा ः जगताप
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीतील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट व्यवसाय कोरोनामुळे पूर्णपणे बंद असून दुसरीकडे नगरपंचायतने पाणीपट्टी व इतर करांमध्ये भरमसाठ वाढ केली असल्याने शिर्डीकरांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम या जाचक व वाढीव करांमुळे होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टी व कर पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्याकडे नुकतीच केली आहे.
राज्यभरात अनेक शहरे पुन्हा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. शिर्डीच्या आजूबाजूच्या राहाता, कोपरगाव शहाराची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. तेथील बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहे. परंतु याकाळात जागतिक दर्जाचे तीर्थस्थान असणारी शिर्डी मात्र प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. शिर्डीच्या सर्व बाजारपेठा, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व वित्तीय संस्थांवर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांचा दैनंदिन उदरनिर्वाह होणे कठीण होऊन बसले आहे. शिर्डीचे अर्थकारण पूर्णतः श्री साईबाबा मंदीर, साईभक्त व पर्यटनावर अवलंबून असल्याने शहरात ना साईभक्त, ना पर्यटक येत असल्याने शिर्डीच्या अर्थव्यवस्था रथ स्तब्ध उभा आहे. यामुळे शिर्डी नगरपंचायतने सन 2020/21 च्या आर्थिक वर्षात घरगुती, व्यावसायिक वापराची पाणीपट्टी व ठेव रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे नागरिकांवर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. एकीकडे स्वतःचे घर चालविण्या पुरतेही उत्पन्न नाही. त्यामुळे अन्यायकारक घरगुती व व्यावसायिक वाढीव पाणीपट्टी व व्यापारी संकुलातील दुकानदारांचे दुकान भाडे रद्द करून पुढील सहा महिने भरण्याची मुभा द्यावी. तसेच येत्या आठ दिवसांत वाढीव पाणीपट्टी रद्द न केल्यास शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करून शिर्डी नगरपंचायतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात महिलांसमवेत लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा नगरसेविका जगताप यांनी दिला आहे. यावेळी कस्तुरी मुदलियार, लक्ष्मी आसने, अनिता सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, दत्तात्रय आसने, अनिल गोंदकर, किशोर सुर्वे उपस्थित होते.