राहात्यातील शेतकर्याची सात लाख रुपयांची फसवणूक
नायक वृत्तसेवा, राहाता
हरभरा, सोयाबीन व ज्वारी खरेदी करून खात्यावर पैसे नसताना 7 लाख 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन शेतकर्याची फसवणूक केल्याप्रकरणी गणेशनगर येथील रमेश कोंडाजी कोल्हे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
राहाता येथील मिलिंद सुरेश गांधी (वय 40, रा.15 चारी, राहाता) या शेतकर्याने आपल्या शेतामध्ये पिकवलेले सोयाबीन, हरभरा व ज्वारी पीक उत्पादित करून त्यांचे राहते घरी ठेवले असता सन 2018 मध्ये रमेश कोंडाजी कोल्हे (रा.गणेशनगर कारखाना, ता.राहाता) याने 26 फेब्रुवारी, 2018 रोजी 4 हजार 100 रुपये प्रति क्विंटल दराप्रमाणे 100 क्विंटल अशी 4 लाख 10 हजार रुपये किंमतीची सोयाबीन, 26 मे, 2018 रोजी 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने 40 क्विंटल अशी 1 लाख 60 हजार रुपये किंमतीची ज्वारी आणि 5 हजार रुपये प्रति क्विंंटल दराप्रमाणे 40 क्विंटल असा 2 लाख रुपये किंमतीचा हरभरा 24 एप्रिल, 2018 रोजी खरेदी करून घेऊन गेला होता. त्यानंतर शेतकरी गांधी यांनी विकलेल्या शेतमालाच्या पैशाची मागणी केली असता कोल्हे याने त्याच्या खात्यामध्ये पैसे नसतानाही धनादेश देऊन शेतकरी गांधी यांची 7 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शेतकरी मिलिंद गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 148/2021 भारतीय दंडविधान कायदा 420 नुसार कोल्हे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व मुख्य हवालदार डी. डी. तुपे हे करत आहे.