हनुमंतगाव शिवारात आढळली बिबट्याची पाच बछडे ऊसतोड मजुरांची बसली पाचावर धारण; शेतकर्याने तोड थांबविली
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात बिबट्याची 5 बछडे आढळून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कृष्णांगर जेजूरकर यांच्या शेतात उसाची तोड चालू आहे. भल्या पहाटे मजूर ऊस तोडत होते. ऊस तोडीत असताना त्यांना बछड्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी उसाचे पाचट पेटवून आवाज येणार्या प्राण्यांचा वेध घेतला. तेव्हा 5 छोटी पिले त्यांना आढळून आली. बिबट्याची बछडे पाहून मजुरांची पाचावर धारण बसली.
या प्रकारानंतर मजुरांनी तत्काळ मालकाला संपर्क केल्यानंतर सोमनाथ जेजूरकर तेथे आले. तोपर्यंत उजाडल्याने ही बछडे सर्वांना दिसली. जवळपास बछड्यांची मादी असावी. परंतु मादीचा गुरगुरण्याचा आवाज न आल्याने तसेच ऊस तोडणार्यांची संख्या व त्यांचा आवाज आल्यामुळे कदाचित मादी दूर पळाली असावी. ऊसतोडीचे काम थांबवले. वेळ होऊनही मादीचा सुगावा लागला नाही. सोमनाथ आणि त्याचे जोडीदार यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन तोडणी कामगारांना ऊस तोडण्यास सांगितले.
दरम्यानच्या काळात वन्य प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी येथे भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. मात्र, त्यानी अजून डोळे उघडलेले नाहीत. त्यामुळे दोन चार दिवस वयाचे ही पिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. म्हस्के यांनी वन खात्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असून पिलांना कॅरेटमध्ये झाडाखाली ठेवले आहे. तसेच ट्रॅप कॅमेरा लावून या पिलांना मूळ जागी ठेवण्यात येणार आहे. तत्पूर्वी कृष्णांगर जेजूरकर यांनी ऊस काही काळासाठी तोडणी बंद ठेवण्याची तयारी दर्शविली, जेणेकरून पिलांची आई त्याठिकाणी येऊन पिलांचा स्वीकार करेल. ही बातमी पंचक्रोशीत पसरल्याने बछड्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी दुरूनच पिलांना बघावे आणि त्यांना स्पर्श करू नये, असे आवाहन कृष्णांगर जेजूरकर व विकास म्हस्के यांनी केले होते.