मातुलठाण शिवारातील वाळू उपशावर पोलिसांचा छापा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी (ता.18) श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अचानक छापा टाकून वाळू चोरुन नेणारा ट्रॅक्टर, जेसीबी पकडला. मात्र पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर व जेसीबीवरील चालकांनी धूम ठोकली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली. श्रीरामपूर पोलिसांनी परिसरातील वाळूतस्करांवर शुक्रवारी रात्री कारवाई केली. गुप्त खबरीवरून मातुलठाण शिवारातील गोदावरी नदीपात्रात जेसीबीने वाळू उपसा सुरू असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोदावरी नदीपात्रात छापा टाकून वाळूू चोरुन नेणारा ट्रॅक्टर व जेसीबी पकडला. यावेळी पोलिसांना पाहून जेसीबी चालक व एका ट्रॅक्टरवरील तस्कर पळून गेले. याप्रकरणी पोलीस नाईक लोंढे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅकटर चालक ब जेसीबी चालक यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सतीश गोरे पुढील तपास करीत आहे.
