सोनेवाडी, चांदेकसारे परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान समृद्धी महामार्गाचा भरावाही वाहून आला शेतीपिकांत

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील सोनेवाडी, चांदेकसारे परिसरात शुक्रवारी (ता.8) दुपारी चार ते सहा वाजेच्या दरम्यान अतिवृष्टी झाली. त्यात शेतकर्‍यांच्या काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरलेला खळगा भरावावरून वाहून थेट शेतीपिकात गेल्यामुळे तेथील शेतकर्‍यांचेही मोठं नुकसान झाले आहे. यामुळे जमिनी नापीक होण्याची भीती माजी सभापती शिवाजी वक्ते यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. समृद्धीत जेऊर कुंभारी परिसरात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना शेतीचा दामही चांगल्याप्रकारे मिळाला. मात्र मंगळवारी व शुक्रवारी दुपारी चार ते सहा वाजता झालेल्या पावसाने समृद्धी महामार्गाच्या कामावरून थेट खळगा शेतकर्‍यांच्या शेतात वाहिला. समृद्धी महामार्गाच्या कामापासून एक ते दोन किलोमीटर अतिवृष्टीच्या पावसाने खळगा वाहून आल्यामुळे शेतकर्‍यांची सोयाबीन, मका, ऊस आदी पिके उपळून गेली आहे. या वाहुन आलेल्या खळग्यामुळे जमिनी नापीक होण्याची स्थिती कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात निर्माण झाली आहे. महसूल व कृषी विभागामार्फत या परिसरातील पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने माजी सभापती शिवाजी वक्ते यांनी केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर भर टाकण्यात आली आहे. ही भर टाकण्यासाठी मुरुमाचा वापर करणे गरजेचे होते. मात्र समृद्धीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अतिशय कमी दरात काही शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करून खळगा मीश्रित मातीच ठेकेदारांनी समृद्धीची भर तयार करण्यासाठी वापरली. गेल्या महिन्यापर्यंत कोपरगाव तालुक्यात पावसाची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मंगळवारी रात्री व शुक्रवारी दुपारी जेऊर कुंभारी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने समृद्धी महामार्गाच्या भरावारून हा खळगा वाहिला. जेऊर कुंभारी सावळीविहीर रस्त्यालगत हा मातीमीश्रित खळगा रस्त्यावर आल्याने काही दुचाकीस्वार यावरून घसरून पडले. समृद्धीत जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मोबदला भेटला. मात्र ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी समृद्धी महामार्गाच्या लगत आहेत अशा शेतकर्‍यांना मात्र या समृद्धी महामार्गाचे काम आपल्या मुळावर आल्याचे दिसते आहे. भरावावरून पाणी वाहून जाण्यासाठी तसेच पाणी काढण्यासाठी नाल्या घ्यायला हव्या होत्या, मात्र त्या घेतल्या गेल्या नाही. परिणामी सध्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हा खळगा वाहून गेला. हा खळगा पाणी सोडत नसल्याने जमिनीवर पिके घेण्यास आता अडचण निर्माण होणार आहे, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

Visits: 2 Today: 1 Total: 15428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *