नगराध्यक्षा आदिकांचा चित्तेंवर बदनामीचा दावा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्यावर येथील दिवाणी न्यायालयात 5 कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा ठोकला आहे. याप्रकरणी येत्या सोमवारी चित्ते यांना न्यायालयाने हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. न्यायालयाने चित्ते यांना सर्व साक्षीदार व दस्तऐवज 14 रोजी सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात गैरहजर राहिल्यास सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
भाजपचे चित्ते यांच्या नेतृत्वाखाली शहरात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समिती गठीत करण्यात आली आहे. पालिकेने स्वखर्चाने तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये बसवावा, अशी या समितीची जुनी मागणी आहे. शिवाजी चौकामध्ये 31 मार्चला रात्री काही तरुणांनी अचानकपणे महाराजांचा अन्य एक अश्वारूढ पुतळा आणून बसविला. मात्र, पोलीस प्रशासनाने तरुणांना ताब्यात घेत हा पुतळा त्याठिकाणाहून अन्यत्र हलविला. त्यानंतर चित्ते यांनी 4 एप्रिलला शहर बंदची हाक दिली होती. नगरपालिका पुतळा बसविण्यास चालढकल करत आहे, तसेच पुतळा शहरातील गोविंदराव आदिक नाट्यगृहासमोर उभारण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. चित्ते यांनी यासंबंधी काही पत्रके शहरात वितरित केली होती. पुतळ्याची जागा बदलण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. मात्र, तरीही चित्ते यांनी जाणुनबुजून जनतेची दिशाभूल करुन बदनामीकारक आरोप केले. आणि शहरवासियांमध्ये आपली प्रतिमा मलीन केली. नगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा चित्ते यांचा यामागे हेतू आहे, असे आदिक यांनी म्हटले आहे.