कोपरगावातील पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त

कोपरगावातील पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त
अक्षय काळे, कोपरगाव
शहरात ऐन दीपावली सणाच्या पूर्वीच पालिकेच्या दिवाबत्ती व्यवस्थापनाचा खेळखंडोबा झाल्याने नागरिक त्रस्त असून गुन्हेगारीला चांगलाच पेव फुटला आहे.

कोपरगाव शहरात मार्च ते जुलै काळातील वीजेचा वापर दीपावलीसाठी केला जातो. या वीज वापराचे बिल नगरपालिका अडचणीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीला भरले जात आहे. यामुळे मोठी थकबाकी झाल्याने वीज कंपनी बिलाचा कायम तगादा करून भरण्यास सांगत आहे. मात्र, याचा परिणाम पथदिव्यांवर होऊन वीजबिल खर्चात बचत व्हावी म्हणून पालिका 60 टक्केच पथदिवे वापरतात. शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध भागातील अनेक दिवे बंद असल्याच्या तक्रारी देखील पालिकेकडे येतात. परंतु, तक्रारींबाबत पालिकेचे दिवाबत्ती विभाग प्रमुख रोहित सोनवणे हे साधे फोन उचलण्याची तसदी देखील घेत नाहीत. यामुळे उपनगरे, झोपडपट्टी परिसरात पथदिवे बंद असल्याने महिलांची छेडछाड, लूटमार, अवैध व्यवसाय जोर धरू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दीपावलीच्या खरेदीसाठी महिला व नागरिकांची सायंकाळी झुंबड उडते. याचा फायदा टारगट व भुरटे चोर उचलत आहेत. संकट येऊनही पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाने जागे होऊन तात्काळ पथदिव्यांची दुरुस्ती करुन नागरिकांचे भय दूर करावे, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

Visits: 148 Today: 1 Total: 1592280

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *