आता माजी उपनगराध्यक्षांनी तुडवले नामदार थोरातांचे ‘संकेत’! मनाई करुनही बसस्थानकावर फ्लेक्स लावण्याचा मोह; शहराचे विद्रुपीकरण काही थांबेना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बसस्थानकाच्या आवारात आपल्याच कार्यकर्त्यांनी उभारलेले आपलेच ’फ्लेक्स’ काढून ’आदर्श’ निर्माण करणार्‍या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आदर्श ‘संकेत’ त्यांच्याच समर्थकांकडून पायदळी तुडविण्याचे सत्र कायम असून आता माजी उपनगराध्यक्षांना या परिसरात फ्लेक्स लावून चमकण्याचा ‘मोह’ झाला आहे. नववर्षाच्या दिवशीच संगमनेरच्या नेतृत्त्वाने अर्धाडझन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ‘बसस्थानकावर पुन्हा फ्लेक्स लावून विद्रुपीकरण होणार नाही’ याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कालाय तस्मै या उक्तीप्रमाणे या सर्वांना त्याचा सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतरही बसस्थानकाच्या परिसरातील विद्रुपीकरण थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे सध्या बसस्थानकावरील दत्त मंदिर परिसरात लावण्यात आलेला फ्लेक्स ‘वाढदिवसा’चे औचित्य साधण्यासाठी उभारण्यात आला आहे. या कृत्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून ‘फ्लेक्स फ्री’ असलेल्या बसस्थानक परिसरातील विद्रुपीकरणाचाही शुभारंभ झाल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली आहे.


जिल्ह्यात सर्वाधिक देखणे ठरलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात कथित व स्वयंघोषीत नेत्यांकडून आपले फ्लेक्स लावून चमकोगिरीस सुरुवात झाली होती. चालू वर्षाच्या पहिल्याच दिवशी संगमनेर दौर्‍यावर असलेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी तडक फ्लेक्स लावलेल्या ठिकाणी जावून आपल्या उपस्थितीत या परिसरात लावलेले सर्व फ्लेक्स हटविण्यास लावले. विशेष म्हणजे ते सर्व फ्लेक्स त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाने उभारलेले होते. यावेळी काहींनी ही बाब त्यांच्या निदर्शनासही आणून दिली, मात्र त्यांना फटकारीत नामदारांनी यापुढे या परिसरात कोणाचेही फ्लेक्स लागणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश संगमनेरचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व प्रशासन अधिकारी अशा अर्धाडझनाहून अधिक अधिकार्‍यांना दिले होते.

त्यानंतर चार महिने हा परिसर फ्लेक्स मुक्त झाल्यानंतर 8 एप्रिल रोजी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शैलेश कलंत्री यांची निवड झाली. त्या प्रित्यर्थ त्यांच्या समर्थकांनी नामदारांच्या संकेताकडे दुर्लक्ष करुन पहिल्यांदा या परिसरात शुभेच्छा व्यक्त करणारा फ्लेक्स लावला. दैनिक नायकने संबंधितास याबाबत त्याच दिवशी आपल्या लिखाणातून जाणीव करुन देताच कलंत्री यांनी सायंकाळी तो फ्लेक्स काढून घेतला. त्यानंतर अपवाद वगळता हा परिसर गेल्या आठ महिन्यांपासून फ्लेक्स मुक्त दिसत होता. मात्र आता महसूलमंत्री थोरात यांच्या समर्थकांना पुन्हा एकदा त्यांच्या आदर्श ‘संकेता’चा विसर पडला असून पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षानेच त्यांना पायदळी तुडविले आहे.

राज्याचे विद्यमान महसूलमंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी गेल्या चार दशकांच्या कालावधीत संगमनेर तालुक्यातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्याच्या विविध योजनांसह शहराच्या वैभवात भर घालणार्‍या अनेक शासकीय व प्रशासकीय इमारती उभ्या केल्या. संगमनेरचे नूतन बसस्थानक म्हणजे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि अतिशय देखणी इमारत म्हणून लौकीकास आली. मात्र सुरुवातीच्या काळात केवळ फ्लेक्समध्ये कर्तृत्त्व दिसणार्‍या काही स्वयंघोषीत नेत्यांनी या देखण्या इमारतीला फ्लेक्सचा विळखा घालण्यास सुरुवात केल्याने या इमारतीचे सौंदर्य काळवंडू लागले होते. मात्र खुद्द मंत्री थोरात यांनी स्वतः उपस्थित राहून आपलाच फ्लेक्स हटवून ‘पुन्हा या भागात फ्लेक्स नको’ असे स्पष्ट संकेत अधिकार्‍यांना व पदाधिकार्‍यांना दिले. मात्र आठ महिन्यानंतर या सर्वांना त्याचा विसर पडला असून पालिकेचे पदाधिकारीच नामदार साहेबांच्या संकेतांना पायदळी तुडविण्यात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.


बसस्थानकावरील दत्त मंदिराचा परिसर म्हणजे दिवसभरात प्रत्येक संगमनेरकर नागरिकाची नजर जाणारे ठिकाण. या भागात आपला फ्लेक्स लागावा यासाठी अनेकांची धडपड असते. मात्र नामदारांच्या आदेशानंतर गेल्या मोठ्या कालावधीपासून हा परिसर ‘फ्लेक्स मुक्त’ झाला होता. आता पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इम्रान शेख यांनीच पुढाकार घेत या परिसराचे पुन्हा विद्रुपीकरण सुरु केले असून गेल्या तीन दिवसांत नामदार साहेबांचा ‘आदेश’ श्रवणार्‍या एकाही अधिकार्‍याला मात्र ते दिसलेले नाही हे विशेष.

Visits: 53 Today: 1 Total: 404922

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *