इंधन दरवाढीवरून भाजप आता कोणाच्या पुतळ्याला जोडे मारणार? आमदार डॉ. सुधीर तांबे; अकोलेत काँग्रेसची बैलगाडी व सायकल रॅली

नायक वृत्तसेवा, अकोले
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अगोदर घिसडघाईने नोटाबंदी व वस्तू सेवा कर लागू करुन सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता इंधन दरवाढ करून अक्षरशः जगणे मुश्कील केले आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 71 रुपये झाले असताना पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करणार्या भाजपने आता इंधनाचे भाव शतकापार गेले असताना कोणाच्या पुतळ्याला जोडे मारणार? असा सवाल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विचारला आहे.

राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने अकोले येथे कोल्हार-घोटी महामार्गावर बुधवारी (ता.14) इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी व सायकल रॅली काढण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, उत्कर्षा रुपवते, मीनानाथ पांडे, थोरात कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, विक्रम नवले, रमेश जगताप, मंदा नवले, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे, शंकर वाळुंज, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी, पाटीलबा सावंत, आरिफ तांबोळी, भास्कर दराडे, उबेद शेख यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून जितक्या लवकर पायउतार होईल तितके देशाचे नुकसान कमी होईल. त्यामुळे युवक व महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन देशातील नागरिकांना मोदींच्या धुंदीतून बाहेर काढावे असे आवाहन केले. ज्येष्ठ नेते मधुकर नवले म्हणाले, जागतिक बाजारापेठेत तेलाचे दर प्रतिबॅरेल 111 डॉलर असताना मनमोहन सिंग सरकारने पेट्रोलचे दर 71 रुपयांच्या पुढे जाऊ दिले नाही. आता जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर 40 डॉलर असताना पेट्रोलचे दर शतकापार गेले आहेत. यावेळी अनेक मान्यवरांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेवटी तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी आभार मानले.
