बोगस वैद्यकीय पदव्यांमुळे गुन्हा दाखल असलेले वाणी रुग्णालय पुन्हा चर्चेत! मयत महिलेच्या नातेवाईकांनी ‘पक्के बिल’ मागितले म्हणून डॉक्टर व त्यांच्या कर्मचार्‍यांची धिटाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नसलेल्या पदव्यांचा दिखावा करुन तीन वर्षांपूर्वी फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या संगमनेरातील वाणी रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तब्बल बारा दिवस कोविड रुग्णावर उपचार करुनही रुग्ण दगावल्यानंतर उपचारांची कागदपत्रे व पक्के बिल मागणार्‍या मयताच्या नातेवाईकांनाच डॉ.प्रतीक वाणीसह त्यांच्या रुग्णावालयातील परिचारिका आणि मेडिकल दुकान चालकाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या घटनेनंतरही संबंधित रुग्णालयाच्या संचालकांसह मारहाण करणार्‍यांवर अदखलपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली असून संगमनेरातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी मात्र याप्रकरणी तोडावर बांट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राजापूरातील एका वयस्कर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या 26 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शहरातील वाणी रुग्णालयात दाखल केले होते. कोविडग्रस्त महिलेवर त्या दिवसापासून 7 मे पर्यंत याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र बारा दिवसांनंतर 7 मे रोजी त्या महिलेचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात 60 हजार रुपये डिपॉझिट व औषधांचे 35 हजार असे एकूण 95 हजारांची रक्कम भरली होती. मयतेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतांना रुग्णालयाचे व मेडिकलचे पक्के बिल देण्याची विनंती केली. मात्र सदर रुग्णालयाने राहीलेले बिल भरा त्यानंतर तुम्हाला पक्की बिलं देवू असे तोंडी सांगून या रकमेच्या कच्च्या पावत्या त्यांना दिल्या.

त्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची राहिलेली रक्कम तशीच ठेवून अंत्यविधीचे व अन्य सोपस्कार उरकल्यानंतर भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मयत झाल्याच्या एक महिन्याने 7 जून रोजी मयत महिलेचा नातू आपल्या काही नातेवाईकांसह सदर रुग्णालयात आला व त्याने तुमचे राहिलेले पैसे भरतो, मला शासकीय योजनेसाठी पक्की बिलं द्या अशी मागणी केली. त्याचा राग येवून त्यावेळी तेथे उपस्थित असलेले रुग्णालयाचे संचालक डॉ.प्रतिक वाणी यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तर त्यांच्या रुग्णालयातील परिचारिका मनीषा व मेडिकल दुकानाचा चालक वामन यांनीही डॉक्टरला साथ देत मयत महिलेच्या नातूसह त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व ‘रुग्णालयाचे बिलं भरण्याची तुमची लायकीच नाही’ असे म्हणत त्यांना तेथून हुसकावून दिले.

सोमवारी (ता.7) दुपारी दोन वाजता घडलेल्या या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. त्यांनी मारहाण झाली असल्यास फौजदारी कारवाई करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संबंधित मयतेच्या नातूने सोमवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत तक्रार अर्ज दाखल केला. त्यावरुन पोलिसांनी डॉ.प्रतिक वाणी याच्यासह त्यांच्या रुग्णालयातील परिचारिका मनिषा व रुग्णालयातील मेडिकलचा चालक वामन यांच्यावर भा.द.वी कलम 323, 504, 506 अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तहसीलदारांच्या आदेशावरुन संबंधित रुग्णाच्या बिलाचे ऑडिटही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मयत महिलेच्या नातेवाईकांनी बिल भरण्यास असमर्थतता दर्शविली नव्हती, तर त्यांनी फक्त घेतलेल्या पैशांचे पक्के बिल द्यावे अशी रास्त मागणी केली होती.

2018 मध्ये समनापूरातील एका महिलेच्या बेकायदा गर्भपातावरुन जिल्हा शल्यशिकित्सकांकडे निनावी तक्रार दाखल झाली होती. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने 2 ऑगस्ट, 2018 रोजी शहरातील वाणी रुग्णालयावर छापा घातला असता डॉ.श्रद्धा श्रीपतराव होळकर-वाणी यांच्याकडे स्त्री प्रसृती अथवा गर्भपात करण्याची पदवीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यातही कहर म्हणजे आयुर्वेदाची पदवी प्राप्त केलेल्या डॉ.श्रद्धा होळकर-वाणी आपल्या रुग्णालयाच्या फलकावर व रुग्णांना देत असलेल्या औषधांच्या चिठ्ठ्यांवर ‘बी.एच.एम.एस.डी.जी.ओ’ अशी पदवी दर्शवित असल्याचा प्रकारही पथकाच्या लक्षात आला. त्यानुसार जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत यावर चर्चा होवून डॉ.होळकर-वाणी यांना पंधरा दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या लेखी खुलाशावर समाधान न झाल्याने सप्टेंबर 2018 मध्ये समितीने त्यांच्या वैद्यकीय कलमांसह फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना बजावले.

या दरम्यान संगमनेरचे बोगस डॉक्टर शोध समितीचे प्रमुख असलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी वाणी रुग्णालयाला भेट देवून कारवाई करण्याऐवजी त्यांना रुग्णालयाच्या फलकासह औषधांसाठी देत असलेल्या चिठ्ठ्यांवरुन ‘डी.जी.ओ’ ही पदवी काढण्याचा ‘मोलाचा सल्ला’ देत त्यांना या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार संबंधिताने फलकावरील पदवी खोडली. याबाबत दैनिक नायकने त्यावेळीही ‘बांधिलकी जनहिताची’ या ब्रीदाशी बांधिल राहून आपली भूमिका बजावल्याने त्याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिल्याने 26 डिसेंबर, 2018 रोजी डॉ.श्रद्धा श्रीपतराव होळकर-वाणी यांच्यावर भारतीय दंड संहितेत फासवणुकीच्या गुन्हात वापरल्या जाणार्‍या कलम 420 सह फलकावरील नाव पुसून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी कलम 201 व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या कलम 36 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी पैशाच्या हव्यासापायी डॉ.श्रद्धा होळकर-वाणी यांनी शिक्षण नसतांना खोट्या पदव्यांचा उल्लेख करुन, अ‍ॅलोपॅथी उपचारांची परवानगी नसतानाही त्या पद्धतीने रुग्णांवर उपचार केले. इतकेच नव्हेतर त्यांनी ‘डी.जी.ओ’ ही खोटी पदवी दर्शवून रुग्णांची फसवणूक केली व बेकायदा गर्भपातही केला होता. तत्कालीन परिविक्षाधीन मुख्याधिकारी डॉ.प्राजित नायर यांनी पुढाकार घेवून दाखल करण्यास भाग पाडलेल्या या गुन्ह्याच्या विरोधात डॉ.होळकर-वाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही धाव घेतली होती, मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशाच आली होती. ‘त्या’ प्रकरणात डॉ.होळकर-वाणी यांच्यावर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल असूनही त्यांना आजवर अटक झालेली नाही, आता मयताच्या नातेवाईकाकडून बोटभर चिठूडीवर लाखाची रक्कम मागीतल्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यावसान थेट मयताच्या नातेवाईकांना बेदम मारहाण करण्यात झाल्याने वाणी रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले असूनही या गंभीर विषयाकडे अतिरीक्त बिल शोध समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह संगमनेरचे वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने एकंदरीत या प्रकरणाचे गांभिर्यही वाढले आहे.

या प्रकरणी डॉ.प्रतीक वाणी यांचा खुलासा..
या घटनेबाबत वाणी रुग्णालयाची बाजू समजून घेण्यासाठी डॉ.प्रतीक वाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून घडलेला घटनाक्रम मांडला. त्यानुसार संबंधित इसमाची आजी 7 मे, 2021 पर्यंत त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत होती. त्यांच्या उपचारच्या राहिलेल्या बिलाच्या रकमेसाठी सोमवारी (ता.7) त्यांचा नातू रुग्णालयात आला व त्याने आम्ही बिल भरणार नाही अशी भूमिका घेतली. तसेच, रुग्णालय व मेडिकल दुकानातून जास्तीचे बिल मिळावे अशी अवास्तव मागणीही तो करू लागला. मात्र आमच्या रुग्णालयात असे प्रकार चालत नाहीत. त्यामुळे आम्ही असे बेकायदा कृत्य करण्यास साफ नकार दिला. यावेळी संबंधित तरुणाला शासकीय नियमानुसार सदरचे बिल एक लाखाच्या आत असून रुग्णाच्या नातेवाईकांची परिस्थिती नसेल तर मानवतेच्या नात्यातून ते बिल आणखीन कमी करू असेही सांगण्यात आले. मात्र ते देखील मान्य न करता संबंधित तरुणाने डॉ.प्रतीक वाणी यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका मनीषा शेळके व मेडिकल स्टोअर्सचे चालक तुषार वामन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आमच्या रुग्णालयातील परिचारिकेने आत्मसन्मान म्हणून केवळ प्रतिउत्तर दिले. असे असतानाही संबंधाने माध्यमांमध्ये खोट्या बातम्या देऊन व त्यांना खोटी माहिती पुरवून पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसतानाही आमच्या बदनामीचे षडयंत्र रचले व एकप्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि शिवीगाळ करतानाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, ते आम्ही पोलिसांना देणार आहोत. त्यावरून जे सत्य आहे ते समोर येईलच. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे कोविड रुग्णांची सेवा करीत असून आत्तापर्यंत आम्ही अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्याची बाब समोर आल्यानंतर आम्ही अशा रुग्णांना बिलातून मोठ्या सवलतीही दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. सदरचा प्रकार धादांत खोटा असून त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले आहे. प्रामाणिकपणे सेवा करूनही असा प्रकार घडत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम डॉक्टरांच्या मानसिकतेवर होतो हे मी स्वतः अनुभवत आहे.

Visits: 82 Today: 2 Total: 1099565

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *