कोल्हार-कोपरगाव महामार्ग भू-संपादन प्रकरणी शिर्डीत बैठक महसूल मंत्र्यांच्या सूचनेवरुन बैठक; पुढील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार

नायक वृत्तसेवा, राहाता
कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वांतत्र्यांनंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. भूसंपादन न होताच या रस्त्यासाठी शेतकर्यांच्या शेतजमिनी जात आहे. या प्रकरणाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दखल घेत त्यांच्या सूचनेनंतर शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयात शेतकर्यांची नुकतीच बैठक पार पडली. तसेच पुढील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील आठवड्यात होणार आहे.

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी आजपर्यंत भू-संपादन झालेले नाही. राज्य महामार्ग असणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतर झाला आहे. सध्या या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जशी गरज वाढेल तशी या रस्त्याची रूंदी वाढविण्यात येत आहे, मात्र एकदाही भूसंपादन करण्यात आले नाही.

शेतकर्यांच्या शेतजमिनी रस्त्यासाठी परस्पर रस्त्यात जात असल्याचा शेतकर्यांचा आरोप होता. जमिनीचा सर्व्हे व्हावा, आवश्यक जमिनीचे संपादन व्हावे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकर्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केल्यावर मंत्री थोरात यांच्या सूचनेनुसार शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजगुरू, जागतिक बँक प्रकल्पाचे उपअभियंता रवींद्र चौधरी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे राहाता तालुका असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, मोहन निर्मळ, योगेश निर्मळ, अर्जुन निर्मळ आदी शेतकर्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. जादा जाणार्या जमिनी संपादित कराव्यात, रस्त्यांची हद्द निश्चित करावी, संपादित जमिनीचा मोबदला मिळावा आदी मागण्या यावेळी केल्या.

कोल्हार-कोपरगाव रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग योजनेतून सध्या काम सुरू आहे. शेतकर्यांचा रस्त्याच्या कामाला विरोध नाही, रस्त्याचे संपादन न होता शेतजमिनी रस्त्यात जात आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी नव्हते. पुढील आठवड्यात संबंधित अधिकार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले आहे.
– योगेश निर्मळ (शेतकरी-पिंपरी निर्मळ)
