खडकीमध्ये अवैध दारूविक्रेत्यांच्या मारहाणीत तरुणाचा खून! पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी उपोषण केले स्थगित

नायक वृत्तसेवा, अकोले
अवैधरित्या दारू विक्री करणार्या लोकांनी घरात घुसून एका तीसवर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे रविवारी (ता.6) रात्री घडली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर खडकी ग्रामस्थ संतप्त होऊन खून करणार्या दारू विक्रेत्यांना तातडीने अटक करावी आणि खडकी बुद्रुक गावात अवैध विक्री होणार नाही, असे पोलीस प्रशासनाने लेखी दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेऊन श्री दत्त मंदिरात उपोषण सुरू केले होते. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

खुनाच्या घटनेनंतर सरपंच श्रावण भांगरे, गणपत भांगरे, नामदेव भांगरे, महिला व ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी राजूर पोलीस ठाण्याला येऊन संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देऊन लेखी मागणी करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी लेखी हमी दिल्यानंतर सोमवारी (ता.7) दुपारी दोन वाजता ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला तर बीट हवालदारांची बदली दुसर्या बीटला करण्यात आल्याने उपोषणही थांबविण्यात आले.

या प्रकरणी राजूर पोलिसांत वाळू भगवंता बांडे (वय 30) या मयत तरुणाचे वडील भगवंत शंकर बांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी भीमा चिंतामण बांडे, हरिश्चंद्र बाजीराव बांडे, स्वप्नील भीमा बांडे यांनी संगनमत करून हातात लोखंडी पाईप, गज, काठ्या घेऊन आमच्या घरासमोर येऊन मुलगा वाळू बांडे, काळू बांडे, बाळू बांडे यांना जोरदार मारहाण केली. त्यात वाळू बांडे याच्या डोक्यात गज घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे मुले हाताला व डोक्याला लागल्याने जखमी झाले आहेत. यावरून पोलिसांनी भादंवि कलम 302, 324, 34 प्रमाणे आरोपी भीमा चिंतामण बांडे, हरीशचंद्र बाजीराव बांडे, स्वप्नील भीमा बांडे या तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खैरनार हे करत आहे.

दारूवाल्यांची मुजोरी किती वाढली आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. असा खून झाल्यावर मग प्रशासन जागे होते. माणसांच्या जीवापेक्षा हप्ते महत्त्वाचे ठरत आहेत. किमान या घटनेनंतर तरी राजूर आणि परिसरातील अवैध दारू विक्री बंद करावी. अन्यथा राजूर पोलीस ठाण्यापुढे आंदोलन करण्यात येईल.
– हेरंब कुलकर्णी (कार्यकर्ते, दारूबंदी आंदोलन समिती, अकोले)
