जयहिंद लोकचळवळीचा जगाला सुदृढ समाज निर्मितीचा मंत्र ः डॉ.छाबरिया

जयहिंद लोकचळवळीचा जगाला सुदृढ समाज निर्मितीचा मंत्र ः डॉ.छाबरिया
एकात्मिक शेती व सुदृढ समाजव्यवस्थेवर ऑनलाईन चर्चासत्र संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक अशांतता, कोरोनाचे संकट, दुरावत चाललेली माणुसकी, वाढत चाललेला भ्रष्टाचार, सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान या सर्व बाबींवर जयहिंद लोकचळवळीने आयोजित केलेल्या ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून महत्मा गांधींच्या विचारांवर आधारित सुदृढ व निरोगी समाज व्यवस्थेचा मंत्र जगाला दिला असल्याचे प्रतिपादन ओमान देशामधील सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व गायिका प्रा.डॉ.नितू छाबरिया यांनी केले.


जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समध्ये ‘निरोगी व सुदृढ समाज व्यवस्था’ या विषयावर त्या बोलत होत्या. यामध्ये जयहिंदचे संस्थापक आमदार डॉ.सुधीर तांबे, अमेरिकेमध्ये कार्यरत औषधतज्ज्ञ डॉ.रवींद्र गोडसे, इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ.संग्राम पाटील, सबरिना चौधरी, अरीफ रेहमान, डॉ.टेलर व्हर्नन सहभागी झाले. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, समन्वयक संदीप खताळ, उत्तम जगधने, अ‍ॅड.सुहास आहेर आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना डॉ.छाबरिया म्हणाल्या, चांगला समाज, चांगला देश यासाठी प्रत्येकाने स्वत: चांगले होणे गरजेचे आहे. आणि हा मूलमंत्र जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिला जात आहे. आज हाच मंत्र ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला शांती व मानवतेचा संदेश दिला. हाच मंत्र युवकांच्या माध्यमातून समाजामध्ये रुजवताना सुदृढ व निरोगी समाज व्यवस्था उभी करण्याचे काम जयहिंद लोकचळवळ करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही गरज होती आणि ती उणीव भरून काढली असून आगामी काळामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी आपल्या समाजासाठी भरीव काम करावे असे आवाहन त्यांनी केले.


तसेच अमेरिकेतील डॉ.रवींद्र गोडसे म्हणाले, जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावत असून भारतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनाला मोठा वाव आहे. उपेक्षित क्षेत्रामध्ये प्रत्येकाने संशोधनात भर दिला पाहिजे. तर सामूहिक शेतीचे फायदे या विषयावर बोलताना डॉ.सुधीरकुमार गोयल म्हणाले, भारत हा शेतीप्रधान देश आहे; मात्र शेती उपेक्षित क्षेत्र आहे. सामूहिक शेती केल्याने शाश्वत उत्पन्नाचे साधन व नफा-तोटा याचे एकत्रीकरण होऊन शेती फायद्याची होऊ शकते. सध्या व्यापारी पद्धतीने शेती करणे अत्यंत गरजेचे आहे. तर आदिती अमित देशमुख म्हणाल्या, महिलांनी शेतीचे उत्पादन सामूहिक पद्धतीने घेऊन सामूहिक पद्धतीने विक्री केल्याने याला व्यवसाय जोड मिळेल आणि त्यातून महिलांची प्रगती साधेल. महिला हाच खरा देशाचा कणा असून शेतीमधील त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यामध्ये अमेरिकास्थित डॉ.मुकूंद कर्वे, बॅटरी केलवण (पुदुच्चेरी), संजय पिल्ले, वरीष्ठ कृषी अधिकारी विमलकेंद्र शरण आदिंनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन राजा कांदळकर, रवींद्र भालेराव यांनी केले. तर 150 देशातील नागरिकांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला.

Visits: 224 Today: 1 Total: 1424140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *