पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे ः देशमुख

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय असून यापुढील भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपणासह संवर्धन आवश्यक आहे. निसर्ग हाच मोठा गुरू असून त्याने मानवाला त्याच्या पद्धतीने जगायला शिकवले आहे. कोरोना, प्रदूषण यांसारख्या समस्या रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ होणे गरजेची असल्याचे महानंद व संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले.

पर्यावरण दिनानिमित्ताने राजहंस दूध संघाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजहंस दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाजीराव खेमनर, जी.एस.शिंदे, डॉ.प्रमोद पावसे, दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भयानक दुष्काळ, ऑक्सिजनची व पावसाची कमतरता या समस्या वाढल्या आहेत. हे सर्व जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहेत. यावर मात करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खर्या अर्थाने आता लोकचळवळ ठरले आहे, असे शेवटी अध्यक्ष देशमुख यांनी नमूद केले.

पर्यावरणातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी कडूनिंब, वड, पिंपळ, जांभूळ, आवळा यांसारख्या देशी वृक्षांची लागवड पावसाळ्यात करावी.
– रणजीतसिंह देशमुख (अध्यक्ष-महानंद व राजहंस)
