सहकाराच्या आदर्श तत्वांनुसार ‘दूधगंगा’ उत्तमरित्या चालू ः कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार निकोप पद्धतीने कसा चालवावा याची मार्गदर्शक तत्वे घालून दिले आहेत. या आदर्श तत्वांचे पालन करत दूधगंगा पतसंस्था उत्तमरित्या चालू आहे. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसह आमदार डॉ.सुधीर तांबे व ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगून सभासदांसाठी वेगवेगळ्या योजना राबवून संस्था प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी केले आहे.
दूधगंगा पतसंस्थेच्या 31 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना संस्थापक अध्यक्ष कुटे म्हणाले, पूर्वी कोणत्याही संस्थेचे कर्ज काढताना कर्जदारांना किती लोकांचे उंबरठे झिजवावे लागत होते याचा विचार करणे गरजेचे आहे. परंतु आता कर्जदारांना सहजपणे मोठ्या रकमेचे कर्ज उपलब्ध होते ही परिस्थिती संस्थेमध्ये चांगले काम केल्यामुळेच दिसत आहे. या संस्थेमुळे अनेक कुटुंबांनी प्रगती साधली असल्याचे सांगून संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याचे नमूद केले. यामध्ये भाग भांडवल 3 कोटी 76 लाख, ठेवी 137 कोटी 86 लाख, गुंतवणूक 51 कोटी 49 लाख, कर्ज वाटप 109 कोटी 88 लाख, निधी 15 कोटी 76 लाख अशाप्रकारे उत्तम आहे, अशी माहितीही त्यांनी शेवटी दिली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांनी अहवालाचे वाचन करत नफा-तोटा पत्रक, पुढील अंदाजपत्रकाची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, संचालक रामनाथ कुर्हे, निळवंडेचे माजी सरपंच रायभान पवार, थोरात कारखान्याचे युवा संचालक दादासाहेब कुटे, संचालक भास्कर शेरमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुकेवाडीच्या सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाष कुटे, विलास गुंजाळ, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक सातपुते, संचालक राजेंद्र रहाणे, भास्कर गुंजाळ, रघुनाथ कुटे, सुनील गुंजाळ, देवेंद्र काळे, निवृत्ती सातपुते, नदीम शेख, मुक्ताबाई पवार, मंगल सातपुते, जयवंत गुंजाळ, भाऊसाहेब खरात, कैलास घोडेकर, संजय गुंजाळ व सभासद उपस्थित होते. शेवटी देवेंद्र काळे यांनी आभार मानले.