कोरोनामुक्त राहुरीच्या आजीबाईंनी थोपटली खासदार विखेंची पाठ! विळदच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचार दिल्याने दिला आशीर्वाद

नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोनाच्या दुसर्या लाटेत जसा अनेकांचा धक्कादायक मृत्यू झाला, तशीच अनेक माणसे आश्चर्यकारकरित्या बचावलीही आहेत. असेच एक उदाहरण राहुरी तालुक्यातील वरवडे गावच्या आजीबाईंचे आहे. आजींचे वय 70 वर्षे, त्यांचा सीटी स्कोर 22 आला होता, ऑक्सिजन पातळी 50 पर्यंत खालावली होती. तरी डॉक्टारांचे प्रयत्न आणि रुग्णाच्या खंबीर साथीमुळे आजीबाई या संकटातून सुखरुप बाहेर पडल्या. विळद घाटातील डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आजारातून बाहेर पडताच आजीबाईंनी खासदार डॉ.सुजय विखे यांची पाठ थोपटत गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा, असा आशीर्वाद दिला.

या कोविड सेंटरमधून असे अनेक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, या आजींच्या धाडसाचे कौतुक होत आहे. त्यांच्या उपचारासाठी स्वत: डॉ.विखे यांनी घातलेले लक्ष आणि बरे झाल्यानंतर आजीबाई आणि डॉ.विखे यांची भेट यामुळे त्यांची चर्चा झाली. राहुरी तालुक्यातील वरवडे गंगुबाई बर्डे (वय 70) यांना कोरोनाची लागण झाली. मुळा धरणाच्या दुर्गम भागात आदिवासी वस्तीवर त्या राहतात. लक्षणे दिसल्यावर त्यांचा मुलगा अकुंश बर्डे यांनी तपासणी करून घेतली. त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगून तातडीने व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बेडची स्थिती आजच्याप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागली.

बर्डे यांनी थेट खासदार डॉ.विखे यांना गाठले. आपल्या आईची परिस्थिती त्यांना सांगितली. त्यावेळी विखे एका बैठकीत होते. तातडीची गरज लक्षात त्यांनी यामध्ये लक्ष घातले. बर्डे यांना डॉ.विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. स्वत: त्यांची विचारपूस करून धीर दिला. हॉस्पिटलमध्ये 14 दिवस उपचार घेतल्यानंतर बर्डे आजी ठणठणीत बर्या झाल्या. सोमवारी (ता.7) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी पुन्हा खासदार डॉ.विखे यांची भेट घेतली. आनंदाने आजीबाईंनी विखेंना मिठी मारली. जवळ घेत फोटोही काढून घेतला. गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा, असा आशीर्वाद देत आजीबाई आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी घरी परतल्या. त्यांचा मुलगा अंकुश बर्डे यांनी सांगितले की, ‘आईची सुरवातीची परिस्थिती पाहून आम्ही खूप घाबरलो होतो. त्यामुळे धावतच डॉ.विखेंची भेट घेतली. त्यांनी तातडीने हालचाली केल्याने आणि नंतर योग्य उपचार मिळाल्याने आमची आई वाचली’.
