सुसंस्कृत संगमनेरच्या चोहोबाजूला ‘अवैध’ दारुचा खंदक! शहरातील गल्लीबोळात बेकायदा धंदे; पोलिसांकडून मात्र फक्त ‘किरकोळ’ दारु विक्रेतेच लक्ष्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुसंस्कृत शहराची शेखी मिरवणार्या संगमनेरच्या गल्लीबोळातही आता अवैध व्यावसायिक आढळू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून शहर पोलिसांकडून सुरु असलेल्या एकामागून एक कारवायातून ही गोष्ट अधोरेखीत झाली असून, संगमनेरात अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय कसे? असा भाबडा प्रश्न सामान्य संगमनेरकराला पडला आहे. मागील तीन दिवसांत पोलिसांनी दिड डझनावर कारवाया करीत लॉकडाऊनचा लाभ उठवित अवैध व्यावसायिकांनी शहरासह भोवताली खणलेला दारुचा खंदक बुजवण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्याचवेळी शहरातील कत्तलखाने, जुगार, गांजा, वाळुसह अन्य सर्व बेकायदा व्यवसाय मात्र जोमात सुरु आहेत. त्याकडे दुर्लक्ष करीत शहर पोलिसांनी हजार-पाचशे रुपयांची दारु विकणारे लक्ष्य केले असून त्यांच्याकडून काहीच मिळत नसल्यानेच या कारवाया सुरु असल्याची जोरदार चर्चा संगमनेरात सुरु झाली आहे.

गेल्या बुधवारपासून (ता.26) शहर पोलीस अचानक ‘सक्रीय’ झाले असून त्यांना संगमनेरात अवैध व्यवसायिकांचा गराडा पडल्याचा साक्षात्कार झाल्याचे दिसत आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या पोलिसांच्या कारवाया शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरल्या असून दहा-पाच देशी-विदेशी दारुच्या बाटल्या विकणार्यांना पोलीस कायद्याचा धाक दाखवित आहेत. मात्र त्याचवेळी संगमनेरात राजरोसपणे सुरु असलेले बेकायदा कत्तलखाने, जुगाराचे अड्डे, गांजा व चरस सारख्या अंमली पदार्थांची विक्री आणि वाळुवर दररोज दरोडे पडत आहेत, मात्र पोलिसांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. या व्यवसायांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष खुपकाही सांगणारे असून या धंद्यांवर कायद्याचा धाक कधी निर्माण होणार असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे.

मागील तीन दिवसांत पोलिसांनी संगमनेर शहरातील काही भागांसह आसपासच्या राजापूर, चिखली, देवगाव, समनापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, गुंजाळवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून आत्तापर्यंत दिड डझनाहून अधिक किरकोळ दारु विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सुरु केलेली ही धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे, मात्र ती केवळ एका विशिष्ट बेकायदा व्यावयायिकांवरच होत असल्याने संशय निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या वर्षभराच्या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने व त्यातच उद्योग व धंदेही बंद असल्याने काहींनी प्रपंचासाठी कष्टाचा मार्ग सोडून अवैध मार्गाची निवड केली आहे. अशा व्यावसायिकांवरील कारवाईतून जप्त होणारा किरकोळ माल लक्षात घेता ती मंडळी या धंद्यात सराईत असल्याचे दिसत नाही. याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही हे देखील खरे. त्यामुळे किरकोळ विक्रेते का असेना, पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाया यापुढेही सुरु राहायला हव्यात, मात्र त्याचवेळी शहरातील बाकीच्या ‘मोठ्या’ माशांकडेही लख्य देण्याची गरज आहे. अन्यथा पोलिसांची ही कारवाई एका विशिष्ट व्यवसायिकांविरोधातलीच ठरेल.

गुरुवारीही (ता.27) संगमनेर शहर पोलिसांनी सहा ठिकाणी छापे घालून 8 हजार 400 रुपयांच्या देशी व विदेशी दारुसह 15 हजार रुपये किंमतीची एक मोपेड जप्त केली आहे. या कारवायांमध्ये शहरातील इंदिरानगर गल्ली नं. 9 मधील राजेंद्र पांडूरंग वानखेडकर याच्याकडून 2 हजार 40 रुपये मूल्याच्या 17 विदेशी दारुच्या बाटल्या आणि 15 हजारांची विना क्रमांकाची मोपेड, म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात दारु विक्री करणार्या शंकर शिवराम भुजबळ याच्याकडून 1 हजार 650 रुपये किंमतीच्या 11 विदेशी दारुच्या बाटल्या व मालदाड रोडवरील एका पान टपरीच्या आडोशाला विशाल मच्छिंद्र मुर्तडक याच्याकडून अवघ्या नऊशे रुपयांच्या 15 बॉबीसंत्रा नावाच्या देशीदारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील समनापूरात घराच्या आडोशाला देशीदारु विकणार्या उत्तम सुंदर गायकवाड याच्याकडून 1 हजार 560 रुपयांच्या 26 बाटल्या, सुकेवाडीच्या समाज मंदिराजवळ राहणार्या रोहिदास काशिनाथ बर्डे याच्याकडून 1 हजार 350 रुपयांच्या दहा देशी बॉबीसंत्रा आणि पाच विदेशी दारुच्या बाटल्या तर घुलेवाडी शिवारात शोभा गंगाराम सातपुते या 55 वर्षीय महिलेकडून 900 रुपयांच्या 15 देशी दारुच्या बाटल्या शहर पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गुरुवारी झालेल्या या सहा कारवायातून पोलिसांनी 8 हजार 400 रुपये किंमतीच्या 33 विदेशी व 66 बॉबीसंत्रा देशी दारुच्या बाटल्या व 15 हजारांची मोपेड हस्तगत केली आहे. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांविरोधात एल्गार पुकारल्याने शहरातील बेकायदा दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

मागील तीन दिवसांपासून संगमनेर शहर पोलिसांनी अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्याविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. त्याचा परिणाम लॉकडाऊन असूनही शहरातून वाहणारा अवैध दारुचा महापूर आटण्यात झाला आहे, मात्र त्याचवेळी मटका वगळता शहरातील जुगार अड्डे, गांजा व चरस सारख्या अंमली पदार्थांची विक्री आणि संगमनेरचे नाव संपूर्ण राज्यात बदनाम करणारे संगमनेरातील बेकायदा गोवंश जनावरांचे कत्तलखाने मात्र राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे अवैध व्यवसाय करणार्यांच्या एका गटाला एक आणि दुसर्या गटाला दुसरा न्याय देण्याची संगमनेर पोलिसांची भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

