टेम्पो-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी चिंचेवाडी येथील घटना; अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी येथे छोटा टेम्पो व ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवून एक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. सदर भीषण अपघात मंगळवारी (ता.14) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडला असून, यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहे.


याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, छोटा टेम्पो चालक सुनील दत्तात्रय मोहपे (रा.दसई, ता.मुरबाड, जि.ठाणे) हा पोपट मारुती डोमाळे (वय 28), मीराबाई पोपट डोमाळे (वय 25) व मुलगी लक्ष्मी पोपट डोमाळे (वय 8, सर्व रा.बिरेवाडी) यांना घेऊन बिरेवाडी येथे जात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास चिंचेवाडी येथे आला असता त्याचवेळी साकूरकडून संगमनेरच्या दिशेने ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले.

या अपघातात जोराचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. टेम्पो चालक आतमध्ये अडकलेला असल्याने त्याच्यासह जखमींना नागरिकांनी बाहेर काढले. मात्र, गंभीर इजा झाल्याने टेम्पो चालक सुनील मोहपे हा जागीच ठार झाला होता. त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. मुख्य हवालदार गणेश लोंढे, नामदेव बिरे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले तर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास मुख्य हवालदार दशरथ वायाळ हे करीत आहेत.

ट्रॅक्टर हा ताकदवान म्हणून गणला जातो. अनेकदा चिखलात फसलेल्या वाहनांना ताकदीच्या बळावर बाहेर काढतो. परंतु, या भीषण अपघातात थेट ट्रॅक्टरचेच दोन तुकडे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरुन अपघाताची भीषणता देखील लक्षात येते.

Visits: 183 Today: 1 Total: 1872972

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *