शेवगाव भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर
शेवगाव भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर
नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कामाच्या नवीन ठेक्याच्या शुभारंभप्रसंगी सत्ताधारी भाजपच्या दोन गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याचा येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी यांच्या दौर्यावेळीच गटबाजीचे दर्शन घडल्याने कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले होते. गेल्या अडीच वर्षांपासून पालिकेवर भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीकडून भाजपकडे सत्ता आल्याने नागरिकांसह पदाधिकार्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही पदरात फारसे काही पडले नाही. भाजपच्या नगरसवेकातील अंतर्गत गटबाजीमुळे व जिरवाजीरवीच्या राजकारणामुळे मागचा कारभार बरा होता अशी म्हणण्याची वेळ शेवगावकरांवर आली आहे. पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन कामाच्या चौकशीसाठी पक्षाचे दोन नगरसेवक थेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले. पालिकेत पक्षाचीच सत्ता असताना त्यांनी पालिकेच्या काराभाराचे वेगवेगळ्या माध्यमांतून सतत वाभाडे काढले. सर्व साधारण सभेतही महत्वाच्या कामांवरुन, निधीच्या वाटपावरुन पक्षामध्ये धुसफूस सुरुच राहिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोयीप्रमाणे भूमिका घेत त्यांच्यातील गटबाजी कशी कायम राहील याकडेच लक्ष दिले. त्यामुळे अवघे आठ नगरसेवक पक्षाकडे असताना त्यांच्यामध्ये दोन तीन गट कार्यरत होते. पालिकेने 1 कोटी 43 लाख रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका गंगापूर येथील एजन्सीला दिला. त्याचा शुभारंभ भाजपचे राज्य सरचिटणीस व जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, नगराध्यक्षा राणी मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा आशा गरड, तुषार वैद्य, भीमराज सागडे, नगरसेवक नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर यांनी घडवून आणला. या कार्यक्रमाला तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे पत्रिकेत त्यांचे नाव असूनही अनुउपस्थित होत्या. तसेच पक्षाच्या शहर शाखेच्यावतीने शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, नगरसेवक अशोक आहुजा, तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, गणेश कोरडे, महेश फलके, सूरज लांडे, अमोल घोलप आदी उपस्थित होते.