‘संजीवनी’च्या प्राध्यापकांचा अमेरिकेत डंका

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधक प्राध्यापकांनी अमेरिकेत आपल्या संशोधनाचा झेंडा फडकावला. तेथील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच जगातील सर्वोच्च संशोधन असणाऱ्या पहिल्या दोन टक्के संशोधकांची यादी प्रसिध्द केली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद व संजीवनी युनिव्हर्सिटीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डायरेक्टर डॉ. पी. विल्यम यांचा समावेश आहे. यानिमित्त जगभरातील सहा लाख संशोधकांत या दोघांची उच्चस्तरीय संशोधक म्हणून गणना झाली.

संजीवनी शैक्षणिक संकुल आणि युनिव्हर्सिटीच्या दृष्टीने ही भूषणावह बाब असल्याची प्रतिक्रिया संजीवनीचे प्रेसिडेंन्ट अमित कोल्हे यांनी दिली. ‘संजीवनी’चे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी या दोघांचेही अभिनंदन केले. युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांन्सलर डॉ. ए. जी. ठाकूर व संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली आदी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, की जगभरातील सहा लाख संशोधकांत भारतातील केवळ ६ हजार २३१ संशोधकांचा समावेश आहे. त्यात ‘संजीवनी’च्या दोघा संशोधक प्राध्यापकांचा समावेश आहे. डॉ. सय्यद यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १७५ हुन अधिक संशोधनात्मक प्रबंध सादर केले. विविध संशोधनांसाठी त्यांना २० पेटंट मिळाले. त्यांची दहा पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. डॉ. विल्यम यांनी २२७ हून अधिक आंतराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधनात्मक प्रबंध प्रसिध्द केले. विविध संशोधनाची त्यांनी एकूण १२ पेटंट मिळवली आहेत. त्यांची २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Visits: 49 Today: 1 Total: 1099566
