‘कुटुंब’च्या सामाजिक संघर्षाला दानशूरांचा ‘आधार’! मोफत विलगीकरण कक्षासाठी डॉ.सतीश वर्पेंचे एकवीस हजार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या सुरुवातीपासून विविध सामाजिक उपक्रमातून समाजासाठी कार्यरत असलेल्या संगमनेरच्या कुटुंब फाऊंडेशनने सुरु केलेल्या ‘मोफत विलगीकरण कक्षा’ला संगमनेरातील दानशूरांचा आधार मिळत आहे. शुक्रवारी शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.सतीश वर्पे यांनीही या कक्षाला भेट देत ‘कुटुंब’च्या कार्याचे कौतुक केले व आपल्यावतीने रोख 21 हजार रुपयांची मदतही दिली. कोविड महामारीचा सामना केवळ शासन आणि प्रशासनाचा नसून त्यात आपल्या सर्वांच्या सहभागाची गरज आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कुटुंबच्या तरुणांनी एकत्रित येवून सुरु केलेल्या या उपक्रमाचा शहर व परिसरातील अनेक नागरिकांना फायदा होत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.
गेल्या पंधरवड्यापासून संगमनेरातील कुटुंब फाऊंडेशन या तरुणांच्या संघटनेने परिस्थितीची गरज ओळखून ढोले पाटील लॉन्स येथे शंभर खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरु केले. विशेष म्हणजे येथे दाखल होणार्या रुग्णांना सर्वसुविधा दिल्या जातात, मात्र त्या बदल्यात त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. लोकांकडून मिळणार्या मदतीच्या जोरावर सुरु असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांकडून दररोज प्राणायाम व योग करवून घेतले जातात. सकाळचा नाश्ता व चहा, दुपारचे जेवण व चहा, रात्रीचे जेवण आणि औषधे यासर्व सुविधा येथील रुग्णांना अगदी विनामूल्य आहेत. आत्तापर्यंत संगमनेरातील काही संस्था, संघटना व दानशूर नागरिकांनी दिलेल्या दानावर हा उपक्रम सुरु झाला. आजही अनेकजण प्रत्यक्ष तेथे जावून या उपक्रमाची माहिती घेतात आणि समाधानी होवून मदतीचा हात देतात.
संगमनेरातील अनेकांनी आत्तापर्यंत आपापल्या क्षमतेनुसार या संघटनेला मदत केली आहे. शुक्रवारी संगमनेरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ.सतीश वर्पे यांनी या कोविड केअर सेंटरला भेट देवून कुटुंबच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना येणार्या अडचणी, कोविड काळात त्यांनी राबविलेले विविध उपक्रम आदींविषयी माहिती ऐकून त्यांनी 21 हजारांची मदत देण्याची इच्छा दर्शविली. येथे दाखल असलेल्या रुग्णांसाठी यापेक्षा अधिक काही करता आले तर त्यासाठी प्रयत्नांची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तरुणांचा एखादा समूह एकत्रित येवून समाजासाठी, गरजू घटकांसाठी इतके चांगले काम करु शकतो याचे चांगले उदाहरण संगमनेरातून उभे राहील्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
गेल्या वर्षी कुटुंब फाऊंडेशनने पहिल्या ‘घरबंदी’च्या काळात समाजातील काही निराधार व गरजू घटकांना दोनवेळच्या जेवणासह औषधांचा पुरवठा केला होता. दुसर्या संक्रमणात मृत्यूची संख्या वाढल्याने व त्यातून भितीदायक वातावरण निर्माण झाल्याने कोविडने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्काराची गंभीर समस्या उभी राहीली होती. त्यातच काही रुग्णवाहिका चालक परिस्थितीचा फायदा घेवून रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडू लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. अशावेळी कुटुंबच्या सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून मृतांच्या अंत्यसंस्कराचे काम स्वीकारुन आपले सामाजिक दायित्त्व पूर्ण केले. मागील दोन-अडिच महिन्याच्या कालावधीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर शहरासह वडगावपान, माळेगाव हवेली, हिवरगाव पावसा, घुलेवाडी, पिंपळे, निमोण, चंदनापूरी अशा कितीतरी ठिकाणी जावून 76 हून अधिक कोविड मृतांवर शास्त्रोक्त पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे अंत्यसंस्कार करीत मृतांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.
प्रतिक जाजू या ध्येयवेड्या तरुणासह कुटुंबच्या सदस्यांनी कोविडच्या काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी भरीव काम केले आहे. वर्षभर काही ना काही करीत असणार्या धडपड्या तरुणांचा समूह अशी ओळख असलेल्या या गटाने भितीदायक परिस्थिती असतांनाही कोविडने मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांवर अखेरचे संस्कार करण्याची जबाबदारीही अतिशय समर्थपणे पेलली. परिस्थितीच्या गरजेनुसार त्यांनी शहरानजीकच्या राजापूर रस्त्यावर मोफत कोविड केअर सेंटर सुरु करुन कोविड विरोधातील लढाईत कुटुंब फाऊंडेशन अजूनही मैदानात असल्याचे सिद्ध केले आहे.