नायगाव परिसरात वाळूच्या ट्रक पेटविल्या श्रीरामपूर तालुका पोलिसांत दोन गुन्हे दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील नायगाव परिसरातील गोदावरी पात्रातून चोरटी वाळूची वाहतूक करताना पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी एकच धांदळ उडाल्याने तस्करांनी थेट ट्रक जाळण्याचा प्रकार केला. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नायगाव, गोवर्धन, सराला परिसरात रात्री वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू असून गुप्त खबरीवरुन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रात्री नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात जावून कारवाई केली. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी दोन वाळूच्या ट्रक पेटवून दिल्या. यामध्ये ट्रकचे टायर जळून नुकसान झाले आहे. अशाही परिस्थिती एक वाळूचा ट्रक व दोन ट्रक टायर जळालेल्या स्थितीत पोलिसांनी जप्त करुन तालुका पोलीस ठाण्यात आणले.

याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात पोलीस नाईक लोंढे यांच्या फिर्यादीवरुन हायवा डंपर चालक शेखर संजय जाधव (रा.शिरुर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुरनं. 138/2021 प्रमाणे भादंवि कलम 379, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्या गुन्ह्यात मुख्य हवालदार औटी यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो (क्र.एमएच.04, एफडी.662) व एक पांढर्या रंगाचा विना क्रमांकाचा आयशर टेम्पो चालक, मालक व अज्ञातांविरुद्ध तालुका पोलिसांत गुरनं.137/2021 प्रमाणे भादंवि कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करी वाहतूक करण्यासाठी आले असता वाळू भरताना ग्रामस्थांनी या गाड्या अडवून ठेवल्या होत्या. त्यानंतर अज्ञातांनी अंधारात या गाड्या पेटवून दिल्या असल्याचे समजते. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार सतीश गोरे हे पुढील तपास करीत आहे.
