बिलाच्या वसुलीसाठी रुग्णालयाकडून मृतदेहाची तब्बल बारातास हेळसांड! संगमनेरातील चीड आणणार्या प्रकाराने सर्वत्र संताप; तहसीलदारांच्या शिष्टाईने प्रकरणावर पडदा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या आडून देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या एकामागून एक घटना समोर येत असतांना संगमनेरात मात्र अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. जन्मदात्या वडिलांच्या पाठोपाठ मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या उपचारांचे बिल भरायलाच कोणी राहीले नाही म्हणून पैशांसाठी संगमनेरातील एका खासगी रुग्णालयाने चक्क त्याचा मृतदेह तब्बल बारा तास रुग्णालयातच ताटकळत ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मृतकाच्या मित्रमंडळीने वर्गणी करुन चाळीस हजार रुपये भरल्यानंतरही रुग्णालयाने ‘पूर्ण रक्कम’ भरल्याशिवाय मृतदेह न देण्याची भूमिका घेतली होती, मात्र संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी मृतदेहाची हेळसांड केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह रात्री 11 वाजता त्याच्या मित्रांकडे सुपूर्द करण्यात आला. ही वार्ता शहरात पसरल्यानंतर संबंधित रुग्णालयाबाबत संताप निर्माण झाला असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील विद्यानगर परिसरात राहणार्या एका 60 वर्षीय इसमाला कोविडचे संक्रमण झाले होते. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेेवण्यात आले होते. मात्र नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यासाठी घरीच त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था करुन देण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्याशी संपर्कात आल्याने त्यांची 55 वर्षीय पत्नी, 32 वर्षीय मुलगा आणि 30 वर्षीय सूनही बाधित झाल्याचे समोर आले. त्यातच मुलाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जवळपास अकरा दिवस उपचार घेवून आणि सुमारे दिड लाख रुपयांचा खर्च करुनही रुग्णाला फरक न पडल्याने त्याच्या नातेवाईक व मित्रांनी त्याला दुसर्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
मागील नऊ दिवसांपासून त्याच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यान शुक्रवारी (ता.21) त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, मात्र त्यांच्यावर दाहसंस्कार करणारा मुलगाच मृत्यूशी झुंजत असल्याने त्याच्या अनुपस्थितीत त्यांचा अंत्यविधी पार पडला. या घटनेला जेमतेम 20 तास उलटायच्या आंतच कोविडने श्वासांशी संघर्ष करणार्या मुलाचाही जीव घेतला. एकापाठोपाठ बाप आणि लेकाचा मृत्यू झाल्याने पीडित कुटुंबच नव्हेतर अपरिचित असलेल्या व्यक्तिंनाही जबर धक्का बसला. त्यातही दुर्दैव म्हणजे संबंधित तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबात त्याची 55 वर्षीय आणि 28 वर्षीय पत्नी दोघेच होते, मात्र त्यांनाही संक्रमण झालेले असल्याने त्याच्या आईवर घरातच तर पत्नीवर लोणीत उपचार सुरु होते. घरातील दोन्ही पुरुष एका मागोमाग निघून गेल्याने ‘त्या’ कुटुंबाचे तर आभाळच फाटले.
सदरच्या 32 वर्षीय तरुणाच्या मृत्यू नंतर त्याचा अंत्यसंस्कार करायलाही त्याची आई सोडून घरात कोणी नसल्याने विद्यानगर परिसरातील काहींसह त्याच्या मित्र परिवाराने ‘त्या’ खासगी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी संबंधित रुग्णालयाने मयताचा मृतदेह मिळविण्यासाठी त्याच्या उपचारांचा सुमारे दिड लाखांहून अधिक भरणा करण्यास सांगीतला. इतकी मोठी रक्कम आणि भरायलाच कोणी शिल्लक नसल्याची बाब मित्रमंडळींनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र कोविडने काळीजच करपलेल्या डॉक्टरी पेशाने उलट ‘बिल भरा नाहीतर गुन्हा दाखल करु!’ असा सज्जड दम देत तेथे जमलेल्या मंडळीला एकप्रकारे हुसकावूनच लावले.
हा प्रकार समजल्यानंतर पालिकेच्या एका विद्यमान नगरसेवकानेही तेथे धाव घेवून रुग्णालय व्यवस्थापनाला सर्व परिस्थितीचे ज्ञान देवून मयत तरुणाच्या मित्रांनी 40 हजारांची वर्गणी गोळा केली आहे, अजून जमले तर नक्की आणून देतो असे सांगत मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र पैसे घेतल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही या आपल्या वक्तव्यावर संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापन ठाम राहीले. या दरम्यान काहींनी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी सदर मृतकाच्या बिलाचे तत्काळ ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या, मात्र संबंधित रुग्णाला जवळपास सव्वा लाख रुपयांची औषधेच दिली गेल्याने ऑडिमधूनही काही हाती लागले नाही. तो पर्यंत रात्रीचे 11 वाजले होते.
यानंतर मात्र तेथे उपस्थित असलेल्या मयताच्या मित्रमंडळीचा पारा चढला, रुग्णालयाच्या परिसरात तणावही निर्माण झाला. मात्र त्याचा कोणताही परिणाम ‘त्या’ रुग्णालयावर झाला नाही. या सर्व घडमोडीत दुपारी बाराच्या सुमारास मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल बारा तासांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत तसाच रुग्णालयात निपचीत पडून होता. अखेर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार निकम यांनी संबंधित रुग्णालयाला फोन करुन ‘मृतदेहाची हेळसांड केल्यास गुन्हा दाखल करावा लागेल’ असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर हवेत असणारा रुग्णालय व्यवस्थापन चमू जमीनीवर उतरला आणि अखेर मयत तरुणाच्या मित्रांनी जमविलेले 40 हजार रुपये जमा करुन तब्बल बारा तासांनंतर संबंधित तरुणाचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आणि रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोविडच्या गेल्या वर्षभरातील संक्रमणाने मानसातील देव आणि दानव अशा दोन्ही प्रवृत्तीचे पदोपदी दर्शन घडविले आहे. पहिल्या संक्रमणात बाधित आणि गरजूंना मदत करणार्या देवदूतांचे असंख्य हात दिसले, तर दुसर्या लाटेत रुग्ण म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याप्रमाणे त्याला वाट्टेल तसे ओरबाडणार्या दानवांचेही चेहरे समोर आले. मानवतेची परिक्षा पाहणार्या या वर्षात संगमनेरातही अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या. मात्र शनिवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकारातून केवळ आणि केवळ संतापच व्यक्त व्हावा असेच चित्र समोर आले. शहरातील एका रुग्णालयाने उपचार सुरु असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे देयक वसुल करण्यासाठी तब्बल बारा तास मृतदेह अडकवून ठेवावा ही कल्पनाच संतापजनक आहे. या प्रकरणी प्रशासनाने सखोल चौकशी करुन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे.