पाण्याअभावी नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या! माजी आमदार वैभव पिचड यांची जिल्हाधिकारी व जलसंपदाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
निळवंडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे राजूरसह अनेक गावांच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. तसेच उपसा सिंचन योजना बंद पडल्यामुळे शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी 610 मीटर तलांक ठेवावी, तसेच पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली आहे.

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान 610 मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी 610 मीटर पेक्षा कमी झाली. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांतील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.

पाण्याची पातळी कमी ठेवल्याने राजूर-केळुंगण-कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगांव नाकविंदा या तीन उपसा जलसिंचन योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोहोंडूळवाडी, माळेगाव, कातळापूर, कोदणी, रणद बु., लाडगाव, टिटवी, शेणित, मान्हेरे, आंबेवंगण या सर्व गांवाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजूर हे गाव 15 हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहे व इतर गावे हे 3 हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहेत. तरी शासनाने धरणाच्या पाण्याची पातळी 610 मीटर करावी. अन्यथा येथील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करणे अत्यंत गरजेची आहे.

तसेच राजूर-केळुंगण-कोहंडी, पिंपरकणे-शेलविहिरे व पिंपळगाव नाकविंदा या तीनही उपसा जलसिंचन योजनेचे पाणीपट्टीचे बिल शेतकर्‍यांकडून वसुल केले जाते; मात्र पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. पाण्याची पातळी 610 मीटर इतकी करुन शेतकर्‍यांचे व आदिवासी भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तातडीने सोडवावे, पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना जलसंपदा विभागाकडून नुकसान भरपाई द्यावी आणि आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे पाणी त्वरीत उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पिचड यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांचेकडे केली आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 118426

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *