वांबोरीत एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला सायरन वाजल्याने चोरटे पसार; पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांतून कौतुक


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच सायरन वाजला आणि पोलीस हजर झाल्याने चोरटे पसार झाले. या तत्परतेबद्दल नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

राहुरीतील बाजारतळावर महाराष्ट्र बँकेने एटीएम बसविले आहे. मंगळवारी (ता.३१) मध्यरात्रीनंतर अडीच ते तीन वाजेच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा फवारा मारला, एटीएमच्या काचांवर फवारा मारला व एटीएम फोडण्याच्या मार्गावर असतानाच एटीएमचा सायरन वाजला. सायरन वाजल्यानंतर चोरट्यांनी येथून धूम ठोकली.

यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना कॉल केला व त्यांनी लगेच गस्तीवर असणारे सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे, पोलीस मित्र गोरक्षनाथ दुधाडे यांना कल्पना दिली आणि ते पाच मिनिटांत पोहोचले. किमान दहा लाख रुपये एटीएममध्ये असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएमची रक्कम वाचली. एटीएमच्या आसपास पाचशे फुटाच्या अंतरावर वडाचे झाड आहे. या ठिकाणी चोरट्यांनी चारचाकी गाडी उभी केली होती. यावेळेस तीन ते चार मुलं गावामध्ये फलक लावत होते. त्यांनी या आरोपींना पाहिले परंतु आरोपींच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले होते. हे चोर असावे असं लक्षात न आल्यामुळे चोर तरुणांसमोरूनच बँकेकडे गेले.

सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवंत शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वांबोरी पोलीस ठाण्यामध्ये काही संशियतांना बोलावून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब चौकशीचे चक्र फिरवले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले आहेत परंतु त्यांच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बँकेच्या अधिकार्‍याना बोलावून घटनेची खबर नोंदवावी, अशी विनंती केली. यावेळी अधिकार्‍यांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा बँकेचे अधिकारी तक्रार का देत नाही? हा मोठा चर्चेचा विषय बनला असून कोणी तक्रार दिली नाही तर पोलिसांनाही तपास करण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुठली घटना घडली तर तक्रार दाखल केलीच पाहिजे, अशी नागरिकांमधून चर्चा आहे.

Visits: 162 Today: 1 Total: 1416771

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *