पाणी भरण्यासाठी जाण्याच्या रस्त्यावरुन भाऊबंदकी उफाळली! दोन गटात तुंबळ हाणामार्या; परस्परविरोधी तक्रारींनी संबंधातील ‘दरी’ विस्तारली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामायिक विहिरीतून पाणी उचलण्यासाठी वापरात असलेला शेतजमीनीतून जाणारा रस्ता न वापरता उभ्या पिकांतून का जाता? असा सवाल उपस्थित करणार्या दाम्पत्याला सहा जणांनी बेदम मारहाण करण्याचा तर या दाम्पत्याकडून आपल्याच चुलत चुलतीचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी घडलेल्या या दोन्ही घटनांची बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून परस्पर विरोधी फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन्हीकडील एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या भांडणातून आत्तापर्यंत सौहार्दाने चाललेल्या व्यवहारात आता भाऊबंदकीचा शिरकाव झाल्याने परस्पर संबंधातील दरी अधिक विस्तारली गेली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार कोंची अंतर्गत येणार्या पिंपळवाडीत घडला. एकमेकांचे चुलत भाऊ असलेले दोन कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास असून एकाच सामायीक विहीरीतून पाणी उपसून ते शेती करतात. महाराष्ट्राला लागलेल्या भाऊबंदकीच्या अभिशापातून या दोन्ही कुटुंबात यापूर्वीही वादावादी झालेली असून बुधवारी चक्क त्याचे पर्यवसान एकमेकांवर धावून जाण्यात व मारहाण करुन विनयभंग करण्यात आला. यातील पहिल्या फिर्यादीत ज्यांच्या जागेत विहीर आहे त्या दाम्पत्याने आपल्या चुलत पुतण्यास ‘पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी गव्हाचे उभे पिकं तुडवित का जातोस? बांधावरुन जा..’ असे म्हणाल्याचा राग आल्याने चक्क दोन भावांची एकमेकांत जुंपली व त्यात पुतण्यानेही आपला हात धुवून घेत आपल्या चुलत्यास व त्याच्या पत्नीस लाथाबुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण केली. यावेळी जमिन मालकाच्या पत्नीची साडी ओढून चक्क तिच्याच चुलत पुतण्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या आशयाच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी बाप-लेकासह घारगावमध्ये राहणार्या अमोल पंढरीनाथ गाडेकर व मुंबईतील वाशी येथील अमित रावसाहेब साळुंखे, आशाबाई रावसाहेब साळुंखे व संगिता भानुदास लोखंडे या सहा जणांविरोधात विनयभंग, प्राणघातक शस्त्रांनी मारहाण, शिवीगाळ, धमकी व दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तर यातील दुसरी तक्रार गव्हाचे पीक तुडवित जाण्याचा आरोप असलेल्या चुलत पुतण्याच्या पत्नीने दाखल केली आहे. त्यानुसार त्या त्यांच्या घरात स्वयंपाक करीत असतांना त्यांचा चुलत सासरा त्यांच्या घरासमोर आला. यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने अनाधिकाराने घरात प्रवेश केला व फिर्यादी महिलेला पाठीमागून मिठी मारीत अश्लील वक्तव्य केले. फिर्यादीने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली. या गदारोळात पीडितेचे सासरे तेथे आले असता आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत बाजूलाच पडलेली लोखंडी उलथणी त्यांच्या हातावर मारुन त्यांना जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन ‘त्या’ दाम्पत्याविरोधातही विनयभंग, प्राणघातक शस्त्रांनी मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.