जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा चाकू भोकसून खून भानसहिवरे येथील धक्कादायक घटना; तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

नायक वृत्तसेवा, नेवासा
सख्ख्या भावांमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन झालेल्या वादात एकाचा चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.20) दुपारी भानसहिवरे येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेला वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. नय्यूम लतीफ देशमुख (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, भानसहिवरे येथील लतीफ देशमुख यांचे कय्यूम, नय्यूम, रफिक, मोईन व नदीम अशी पाच विवाहित मुलांपैकी कय्यूम हे गावात तर इतर चौघे नगर येथे राहतात. देशमुख यांची भानसहिवरे येथील ऐतिहासिक गढी परिसरात इनामाची अडीच एकर शेत जमीन आहे. त्या जमिनीच्या वाटणीसंदर्भात शेतात आठ जणांची बैठक झाली. त्यात वादावादी होऊन एकाने नय्यूमवर चाकूने हल्ला केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे म्हणाले, पाच भावांमध्ये जमिनीच्या वाटण्यावरून वाद होता. त्या वादातून एकाचा खून झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीची प्रचिती यानिमित्ताने येत आहे. संपत्तीसाठी रक्तातील नात्याचाही कोणताही विचार न करता थेट खून करण्यापर्यंत मजल जात असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत कायद्यांची कठोर अंमलबजावणी आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.

Visits: 212 Today: 1 Total: 1954440

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *