विरोधी पक्षनेत्यांनी फिरण्यासाठी ई-पास काढलाय का? आरटीआय कार्यकर्ते संजय काळेंची तक्रार अर्जाद्वारे मुख्य सचिवांना विचारणा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, त्यांच्या या दौर्‍यांत कोरोना संबंधीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. या दौर्‍याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का, याची माहिती मागविली आहे. राज्यभर दौरे करणार्‍या फडणवीस यांच्या दौर्‍यावर प्रथमच अशी हरकत नोंदविण्यात आली आहे.

फडणवीस यांनी रविवारी अचानकपणे कोपरगावचा दौरा केला. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली होती. यावेळी कोरोनासंबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. त्या अनुषंगाने मुख्य सचिवांकडे माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केला आहे. कोपरगावमधील या कार्यक्रमास येण्यासाठी फडणवीस यांनी जिल्हा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का? दहा पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असे असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती काळे यांनी मागविली असून त्यासोबत कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठविली आहेत.

यासोबतच काळे यांनी सविस्तर तक्रारही केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या राज्यघटनेनुसार नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. सध्या राज्यभर लॉकडाऊन लागू करण्यात आला असून त्यासाठी विविध नियम करण्यात आलेले आहेत. एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. हे पासही निवडक व अत्यावश्यक कारणासाठीच देण्यात येत आहेत. रविवारी फडणवीस यांनी कोपरगावचा दौरा केला. त्यांच्या कार्यक्रमासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेथे करोनाचे रुग्ण दाखल आहेत. अशा ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम घेतले तर साथ कशी आटोक्यात येणार. यापूर्वीही आम्ही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. सामान्यांना नियमांची सक्ती करताना राजकारणी मंडळींनाही नियम पाळण्यास भाग पाडले पाहिजे. कोपरगावमधील या कार्यक्रमाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1573527

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *