संगमनेरात अंगावर पेट्रोल टाकून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवरा-बायकोचे आपसात भांडण होत असल्याने मुलगी आपल्या ताब्यात द्यावी, या मागणीसाठी गणेश चंद्रभान गायकवाड (वय 31, रा.खांडगाव) याने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली आहे.
गणेश गायकवाड याचे व त्याच्या बायकोचे आपसात भांडण होत होते. मुलगी कुणाकडे ठेवायची यावरुन हे भांडण होते. याबाबत महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन नवरा गणेश गायकवाड यास त्याची मुलगी आईकडे ठेवायची की वडिलांकडे ठेवायची हे समजावून सांगत असताना गायकवाड याने पोलीस ठाण्याच्या आवारात जात असताना अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्य हवालदार बी. वाय. टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश गायकवाड याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 253/2021 भादंवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खाडे हे करत आहे.