शिर्डीजवळील विवाहात दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा साईनाथ, साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेताहेत उपचार


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथून जवळच रविवारी (ता.५) संपन्न झालेल्या एका विवाह सोहळ्यातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यात वधू पित्याचाही समावेश असून, या सर्वांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

याबाबतचे अधिक माहिती अशी की, शिर्डीनजीक रविवारी दुपारी वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला तर सायंकाळी मोठ्या थाटामाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही बाजूचे अनेक वर्‍हाडी तसेच नागरिक उपस्थित होते. भोजन केल्यानंतर दहा ते पंधरा जणांना पोटदुखी व उलट्या होण्याचा त्रास जाणू लागला. तर रात्री आठ वाजेनंतर जवळपास दीडशेहून अधिक व्यक्तींना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याने अनेकांनी उपचार घेण्याकरिता रुग्णालयात धाव घेतली. वधू पित्याला देखील पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाला.

विवाह सोहळ्यातील अनेकांना अचानक त्रास जाणू लागल्याने नातेवाईक व आयोजकांनी त्यांना तत्काळ उपचारांसाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत विषबाधा झालेले साईनाथ व साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरिता येत होते. साईबाबा रुग्णालयात जवळपास पस्तीस तर साईनाथ रुग्णालयात अंदाजे शंभरहून अधिक व्यक्तींना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच काही खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले. यातील एकजण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्ण सामान्य विभागात आहेत. विषबाधा झाल्याने विवाह सोहळ्यात एकच धावपळ उडाली असून रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *