अण्णांच्या ‘फास्ट ट्रॅक’ आंदोलनामुळे सर्वांनाच पडला प्रश्न! सरकारकडून येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू

नायक वृत्तसेवा, नगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आत्तापर्यंत विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. मात्र, त्यासाठी त्यांनी सरकारला निर्णय घेण्यास आणि कार्यकर्त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिल्याचे आढळून येते. यावेळी मात्र किराणा दुकानात वाइन विक्रीच्या विरोधात पुकारलेले आंदोलन अतिशय कमी मुदतीत होत आहे. त्यामुळे ही घाई करण्यामागे काय कारण असावे, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने याची दखल घेतली असून हजारे यांच्या पत्राला तातडीने उत्तर देत त्यांच्या मागणीवर विचार सुरू असल्याचे कळविले आहे. सरकारकडून येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळाली. तर, दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांकडून हजारे यांना पाठिंबा आणि विरोधही सुरू झाला आहे.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्याला काही संघटना आणि व्यक्तींकडून विरोध सुरू झाला. हजारे यांनीही यासंबंधी 3 फेब्रुवारीला राज्य सरकारला पत्र पाठवून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. मात्र, त्या पत्राला उत्तर आले नाही. त्यामुळे पाच फेब्रुवारीला लगेच स्मरणपत्र पाठविले. निर्णय मागे घेतला नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याही पत्राला सरकारकडून उत्तर आले नाही. त्यानंतर 9 फेब्रुवारीला हजारे यांनी लगेच दुसरे स्मरणपत्र पाठविले. त्यात बेमुदत उपोषणाची तारीखही जाहीर केली. आंदोलानाची तारीख अगदी काही दिवसांनंतरची म्हणजे 14 फेब्रुवारी ही जाहीर करण्यात आली. वास्तविक पहाता आंदोलनाची तारीख जाहीर करण्याचा आतापर्यंतचा अनुभव पाहता हजारे पुरेशी मुदत देतात. पंधरा दिवस, एक महिना यापेक्षाही मोठी मुदत दिल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. यावेळी मात्र अगदी काही दिवसांचीच मुदत देऊन थेट उपोषणालाच बसण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे हे ‘फास्ट ट्रॅक’ आंदोलन ठरत असून एवढी घाई का केली जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. मंत्रिमंडळाने यासंबंधीचा निर्णय घेऊन त्यावर दुसर्‍या बैठकीच शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शिवाय ती केव्हापासून करणार, असेही काही जाहीर केलेले नाही. या निर्णयासंबंधी दोन मतप्रवाह आहेत. जसा विरोध होत आहे, तसाचा पाठिंबा दिला जात आहे. अशा परिस्थितीत हजारे यांनी तातडीने आंदोलन पुकारल्याने त्याचीही चर्चा सुरू आहे.

इशारा देणार्‍या पत्रात केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही उत्तर देत नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे. या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीने दखल घेण्यात आली. हजारे यांना सीएमओकडून उत्तर मिळाले आहे. आपली मागणी संबंधित विभागांकडे पाठविण्यात येत असून त्यावरील निर्णय आपल्याला कळविण्यात येईल, असे हजारे यांना सीएमओने कळविले आहे. हजारे यांनी इशारा दिल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दारूबंदी चळवळ आणि व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या संघटनांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. असे असले तरी तयारी आणि वातावरण निर्मितीसाठी यावेळी खूपच कमी वेळ असल्याचे कार्यकर्तेही सांगत आहेत.

Visits: 21 Today: 1 Total: 117565

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *