झाडे ‘जगवणारा’ माणूस : मनीष मालपाणी..

श्याम तिवारी, कार्यकारी संपादक
कोणत्याही प्रांताचा किंवा शहराचा इतिहास केवळ इमारतींच्या किंवा रस्त्यांच्या विटांवर लिहिला जात नाही, तर तो तिथल्या माणसांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या संवेदनशीलतेने आणि समाजमनावर त्यांनी उमटवलेल्या ठशाने घडत असतो. संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीत मालपाणी उद्योग समूहाचा वारसा केवळ व्यावसायिक विस्तारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो इथल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेल्या एकात्मिक नातेसंबंधांचा दस्तावेज बनला आहे. या उद्योग समूहाचे संचालक म्हणून मनीष मालपाणी यांची ओळख केवळ एक यशस्वी उद्योजक एवढीच नाही, तर संगमनेराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पटलावरील ‘दीपस्तंभ’ म्हणून ती प्रस्थापित झाली आहे.

जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परें पडो।
मैत्र जीवाचें॥
या पसायदानातील उक्तीप्रमाणेच ज्यांच्या जगण्यात आणि कर्तृत्वात सर्वसामान्यांबद्दलची अपार करुणा दडलेली आहे, अशा मोजक्या व्यक्तिमत्त्वांमध्ये मनीष मालपाणी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या उद्योगविश्वात दबदबा असलेल्या एका मोठ्या औद्योगिक घराण्याशी त्यांचा संबंध असला, तरी त्याचा लवलेशही त्यांच्या साध्या वागण्यात किंवा बोलण्यात कधीही जाणवत नाही. अगदी छोट्या चहावाल्यापासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणारे मनीषजी खर्या अर्थाने जनसामान्यांचे नेते आणि मार्गदर्शक आहेत.

कोणत्याही व्यक्तीच्या जडणघडणीत त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची आणि संस्कारांची मीठ-भाकरी महत्त्वाची भूमिका बजावते. मालपाणी कुटुंबाने संगमनेरच्या औद्योगिक व सामाजिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. याच समृद्ध वारशातून मनीष मालपाणी यांचे व्यक्तिमत्त्व घडले. वयाच्या तिशीतच, म्हणजेच जवळपास दोन दशकांपूर्वी, समाजाच्या सेवेसाठी त्यांनी ‘राजस्थान युवक मंडळाचे’ माध्यम निवडले. ज्या वयात सामान्यतः तरुणांचा कल स्वतःला घडवण्याकडे असतो, त्याकाळात त्यांनी उद्योगाच्या विस्तारासह समाजसेवेचाही विडा उचलला.

दोन हजारच्या दशकांत संगमनेरसारख्या ग्रामीण भागात ‘बिग बजेट’ समजले जाणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘जाणता राजा’ महानाट्य आणणे आणि त्याचे यशस्वी आयोजन करणे ही केवळ प्रशासकीय कसरत नव्हती, तर शिवरायांच्या विचारांचा ज्वलंत वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे ते एक मोठे धाडस होते. मनीष मालपाणी यांनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले. यातूनच त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि सांस्कृतिक सुसंवादाची चुणूक संगमनेरकरांना पहिल्यांदा अनुभवायला मिळाली.

समाजकारण म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी नव्हे, तर तळागाळातील समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधणे होय. मनीष मालपाणी यांच्यातील कल्पकता आणि संवेदनशीलता अनेक प्रसंगांतून दिसून येते. दीड दशकांपूर्वी पर्यंत संगमनेर शहरात उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण व्हायची. नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतं असतं. अशा बिकट प्रसंगी, कोणताही गाजावाजा न करता मनीष मालपाणी पालिकेच्या मदतीला धावून जातं असतं. आपल्या उद्योग समूहाच्या डझनभर टँकरच्या माध्यमातून त्यांनी शहरात आणि उपनगरांमध्ये मोफत व नियोजित पाणीपुरवठा करुन हजारो तहानलेल्या घटकांना मोठा दिलासा देण्याचेही काम केले आहे.

आरोग्याची काळजी किती सूक्ष्मपणे घेतली जाऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी दोन दशकांपूर्वी राबवलेली डासरोधक मोहीम. शहरात डासांच्या प्रादुर्भावामुळे पसरणार्या रोगांना आळा घालण्यासाठी त्यांनी शहरातील हजारो घरांच्या सेप्टिक टँकच्या पाईप्सना डासरोधक जाळ्या बसवण्याची अभिनव कल्पना वास्तवात उतरवली. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची एवढी बारीक काळजी वाहणारा माणूस उद्योगविश्वात विरळाच आढळतो.

केवळ भौतिक सुविधा किंवा आर्थिक विकास म्हणजे शहर समृद्ध होणे नव्हे, तर तिथली सांस्कृतिक स्पंदने जिवंत असणे अत्यंत गरजेचे असते. संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एकशे तीसहून अधिक वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. या प्राचीन आणि पवित्र परंपरांचे पावित्र्य टिकवून त्यात आधुनिकतेची जोड देण्याचे काम मनीष मालपाणी यांनी केले आहे. ‘संगमनेर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून त्यांनी या उत्सवाला नवा आयाम दिला आहे. नृत्य, नाट्य, संगीत, कला आणि अस्सल मनोरंजन यांचा सुरेख संगम या सांस्कृतिक महोत्सवातून दरवर्षी पाहायला मिळतो. त्यातून संगमनेरकरांच्या केवळ मनोरंजनाची भूक भागवली जात नाही, तर स्थानिकांमधील उपजत कलागुणांना व्यासपीठही उपलब्ध करुन दिले जाते. सांस्कृतिक क्षेत्राची उंची कशी वाढवावी, याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या या कृतीतून निर्माण केले आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरें।
पक्षीही सुस्वरे आळविती॥
या अभंगाचा खरा अर्थ मनीष मालपाणी यांच्या जगण्यात उतरलेला दिसतो. त्यांना पर्यावरणाविषयी अगाध प्रेम आणि आस्था आहे. बर्याचदा वृक्षारोपणाचे उपक्रम केवळ राजकीय अथवा सामाजिक इव्हेंटपुरते मर्यादित असतात. फोटोसेशन झाले की नंतर लावलेल्या रोपांकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र मनीष मालपाणी यांच्या वृक्षारोपणाची चळवळ पूर्णपणे वेगळी आहे. ते केवळ झाडे लावत नाहीत, तर ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे पालकत्व स्वीकारतात. दरवर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एखादी उजाड टेकडी, बोडखा डोंगर किंवा रखरखीत पठारभाग शोधला जातो आणि तिथे शास्त्रीय पद्धतीने हजारो रोपांची लागवड केली जाते. खांडगावचा ‘वन-ट्री’, सायखिंडी आणि कर्हेघाटातील देवाचे डोंगर, धांदरफळचा रामेश्वर परिसर आणि कारेश्वराचा डोंगर ही त्याची साक्ष देतात. एकेकाळी जिथे केवळ काटेरी झुडुपं आणि उजाड माळरानं दिसत होती, तिथे आज मनीष मालपाणी यांच्या कल्पक दूरदृष्टीने दोन लाखांहून अधिक झाडे डौलाने उभी राहिलेली बघायला मिळतात.

कधीकाळी बोडखे असलेले डोंगर आज हिरवेगच्च झाले असून, संगमनेरकर नागरिक आपल्या कुटुंबासह, मुलाबाळांसह या निसर्गरम्य परिसरात आता छोटेखानी सहलीचाही आनंद घेतात. हा केवळ हिरवेगारपणा नाही, तर एका माणसाच्या जिद्दीने आणि निसर्गावरील प्रेमाने उभी केलेली जिवंत सृष्टी आहे. म्हणूनच त्यांना ‘झाडे जगवणारा माणूस’ असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही.

बाह्य जगातील धावपळ आणि उद्योगांचे व्यवस्थापन करत असताना मनीष मालपाणी यांचे अंतरंग मात्र अध्यात्माच्या सुखाशी जोडलेले आहे. भगवद्गीता, रामायण आणि महाभारत या ग्रंथांचे नियमित वाचन हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीत त्यांची ही विलक्षण शिस्त आणि तत्त्वनिष्ठा स्पष्टपणे जाणवते. संकट कितीही मोठे असो, त्यावर संयमाने आणि नैतिकतेच्या मार्गाने मात कशी करावी, याचे उत्तम शिक्षण ते आपल्या कृतीतून नेहमीच देत असतात. एखाद्याला मदतीचा हात पुढे करताना त्यांनी कधीही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता मौन पाळून सेवा करणे, हा त्यांचा स्थायीभाव आहे.

अतिशय हळव्या मनाचे, मात्र प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले, उद्योगविश्वात वावरतानाही मातीचा सुगंध न विसरणारे आणि उजाड डोंगरांना हिरवेगार करुन पर्यावरणाचा समतोल राखणारे मनीष मालपाणी संगमनेरच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन लिहिणे म्हणजे एका कर्तृत्वाला वंदन करण्यासारखे आहे. परमेश्वर त्यांना दीर्घायूष्य आणि उत्तम आरोग्य देवो, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची कामे अविरत सुरु राहोत, याच मनःपूर्वक सदिच्छा!

