भोंदू राजेंद्र गडगेचा पाय आणखी खोलात! आता ‘पीसीपीएनडीटी’ नुसार तक्रार; ‘एफडीए’कडूनही कारवाई प्रस्तावित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अंधश्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब जनतेची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणार्या वडगावपानच्या ‘दत्तधाम सरकार’चा तथाकथीत सूत्रधार राजेंद्र बापू गडगे याचा पाय आणखी खोलात गेला आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातून जामीनावर सुटका होताच आता त्याच्याविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंधक कायद्यान्वये (पीसीपीएनडीटी) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड यांनी संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली असून न्यायालयीन सुनावणीनंतर भोंदू गडगेच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी गेल्या एप्रिलमध्येच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शिवाय पोलिसांच्या कारवाईत त्याच्या कथीत आश्रमात सापडलेल्या औषध साठ्यावरुन आता जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासनही सक्रिय झाले असून त्यांच्याकडूनही गडगेविरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे गडगेची ‘आझादी‘ किती दिवसांची? अशा मिश्किल चर्चांना रंगत येवू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात भोंदू राजेंद्र गडगे आणि त्याच्या साथीदारांकडून कॅन्सरसारख्या अतिशय दुर्धर आजारातून मंत्राद्वारा उपचार करण्याचे दावे केले जात होते. राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत त्याच्या भोंदूगिरीचा प्रचार व्हावा यासाठी त्याने आपल्या मुलाच्या मदतीने हायटेक स्टुडिओही उभारला होता. त्यातूनच तो वेगवेगळे व्हिडिओ प्रसारीत करुन दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये जगण्याची आस निर्माण करुन त्यांना आपल्या आश्रमात येण्यासाठी आकर्षिक करायचा. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्यातून असंख्य रुग्ण व नातेवाईक त्याच्या खोट्या दाव्यांना बळी पडून संगमनेरात येत आणि भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन खर्चिक विधी करीत असतं.

संगमनेरातील काही धाडसी पत्रकारांनी नेटाने त्याच्या या उद्योगाचा पर्दाफार्श केल्यानंतर जागृत झालेल्या तालुका पोलिसांनी गेल्या एप्रिलमध्ये त्याच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करीत त्याला अटक केली. त्याचवेळी भोंदू राजेंद्र गडगेचे अन्य व्हिडिओही समोर आल्यानंतर त्यातील एका दाव्याला आधारभूत मानून लेक लाडकी अभियानाच्या राज्य संयोजक वर्षा देशपांडे यांनी भोंदू गडगे विरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंधक कायद्यान्वये (पीसीपीएनडीटी) कारवाईसाठी आरोग्य विभागाला नोटीस बजावली. त्यानुसार त्याचवेळी चौकशी करण्याचे आदेशही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात आले होते.

वर्षा देशपांडे यांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करता भोंदू राजेंद्र गडगे याने दुर्धर आजार मंत्रविद्येने बरे करण्याच्या दाव्यासोबतच पूत्रप्राप्तीचे दावे केल्याचा प्रकारही उजेडात आला. या संदर्भात त्याने त्याच्या दत्तधाम सरकार या कथीत आश्रमात एका पीडितासह त्याच्या कुटुंबाशी असंख्य लोकांसमोर केलेले ‘हमखास कृष्णासारखा मुलगा होईलच..’ अशा दाव्याचा व्हिडिओ हाती येताच त्याची सत्यता पडताळून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड यांनी संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली असून त्यावरील सुनावणीनंतर भोंदू राजेंद्र गडगेच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे.

याशिवाय त्याच्यावर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ‘दत्तधाम’ या त्याच्या वडगावपानमधील साम्राज्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही आढळून आला होता. दाखल गुन्ह्यात त्याचा संपूर्ण तपशिलही दाखवण्यात आला आहे. त्याचा आधार घेवून आता जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासनही सक्रिय झाले असून त्यांच्याकडूनही नव्याने कारवाई प्रस्तावित आहे. आगामी दोन-तीन दिवसांत त्यासंदर्भातही गुन्हा दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे भोंदू गडगेचा पाय आणखी खोलात जाणार असून त्याच्या अडचणी शतपटीने वाढणार आहेत.

विशेष म्हणजे अंनिसच्या राज्यसंयोजक रंजना गवांदे-पगार यांच्या तक्रारीनंतर एप्रिलमध्ये तालुका पोलिसांनी भोंदू राजेंद्र गडगे याच्याविरोधात महाराष्ट्र जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याच्यासह अन्य दोघांना अटक केली होती तर या उद्योगाचा मास्टर माईंड समजला जाणारा आणि सिन्नरमध्ये औषध निर्मितीचा कारखाना चालवणारा ‘शिवधाम सरकार’ आश्रमाचा मालक डॉ.मोहन पुरी अद्यापही पसार आहे. त्याच दरम्यान अटकेत असलेल्या भोंदू राजेंद्र गडगेसह त्याच्या दोघा साथीदारांनी नियमित जामीनासाठी अर्ज केल्याने गेल्याच महिन्यात त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. आता पुन्हा त्याच्या विरोधात पीसीपीडीएनटी कायद्यासह एफडीएकडूनही कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने जामीनाच्या माध्यमातून त्याला मिळालेली ‘आझादी’ किती दिवसांची? यावरुन तालुक्यात चर्चा रंगात आल्या आहेत.

मंत्रविद्येने कर्करोगासारख्या असाध्य रोगाच्या गाठी पातळ करण्याची सोशल माध्यमात उघड जाहीरात करुन भोंदू राजेंद्र बापू गडगे आणि त्याची टोळी सर्वप्रकारचे वैद्यकीय उपचार करुन हात टेकलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नवी आशा निर्माण करायचे. त्यानंतर ‘तो’ रुग्ण या भोंदूच्या जाळ्यात अडकायचा आणि आर्थिक लुटीचा बळी ठरायचा. अशाच प्रकारच्या जाहीराती करुन या भोंदूने पूत्रप्राप्तीचे दावे करुन आपल्या उपचारांनी अनेक महिलांना पूत्रप्राप्ती झाल्याचेही दावे केल्याचे समोर आले. त्यातून त्याच्याभोवतीचा कायद्याचा फास आवळण्यास सुरुवात झाली असून संगमनेरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी त्याच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली असून पुढील दोन दिवसांत एफडीकडूनही स्वतंत्र गुन्हा दाखल होणार असल्याने भोंदू गडगेच्या प्रचंड साम्राज्याला आता घरघर लागली आहे.

