नेवाशात सहा आरोग्य उपकेंद्रांना राजेश टोपेंचा हिरवा कंदील! जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती; दुरुस्तीसही मिळणार निधी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सहा उपकेंद्रांना लवकरच मंजुरी देण्यास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना हिरवा कंदील दाखविला आहे. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा सेंटरचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना त्यांनी आरोग्य संचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
गडाख यांची नुकतीच आरोग्य मंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली. आरोग्य सेवा संचालक साधना तायडे, सहसंचालक डॉ.कांदेवाड, सहसचिव रामास्वामी उपस्थित होते. यावेळी भेंडे आरोग्य केंद्राबाबत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला. माका येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत टोपे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. माका, घोगरगाव, नेवासा बुद्रुक, टोका येथे उपकेंद्रे मिळण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
तालुक्यातील महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णांना तत्काळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी ट्रॉमा सेंटरची, तसेच कुकाणे व सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन होऊन ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणीही मंत्री गडाख यांनी यावेळी केली. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. मोरे चिंचोरे, तामसवाडी येथील आरोग्य केंद्रांसाठीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. नेवासा तालुक्यातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या दुरुस्तीस निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्री गडाखांनी केलेल्या मागणीबाबत मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकार्यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबतही पत्र दिले आहे.
सकारात्मक चर्चा..
अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील आरोग्य सेवेसंदर्भात आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत झाली यामध्ये सकारात्मक अनेक निर्णय झाले. त्याचे दृश्य परिमाण लवकरच दिसतील.
– शंकरराव गडाख (जलसंधारण मंत्री)