पूजा खंडागळेसाठी डॉ.सदानंद राऊत ठरले ‘देवदूत’! तेरा दिवस सर्पदंशावर यशस्वी उपचार करुन काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील आदिवासी गरीब कुटुंबातील पूजा खंडागळे हिला अतिविषारी मण्यार सापाने दंश केला होता. तिच्यावर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील डॉ.मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुप्रसिद्ध औषधी तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी तब्बल तेरा दिवस यशस्वी उपचार करुन पूजाला नुकतेच मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. एकीकडे डॉ.राऊत यांची प्रयत्नांची शर्थ तर दुसरीकडे गावकर्यांची आर्थिक मदतीची पराकाष्ठा, यामुळे पूजा नेहमीप्रमाणे हसूखेळू लागली आहे. याबद्दल उपचारांचे कोणतेही शुल्क न आकारणारे देवदूत डॉ.राऊत यांचा ग्रामस्थांनी यथोचित सन्मान करुन आभार मानले.
![]()
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माळवाडी परिसरातील चिमाजी खंडागळे हे आदिवासी कुटुंब मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन अपत्य असून, यातील पूजा ही अकरा वर्षांची आहे. मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दिवसभर काबाडकष्ट करुन संध्याकाळचे जेवण करुन हे कुटुंब झोपले होते. त्याचवेळी छपराच्या कुडातून रात्रीच्या वेळेस अतिविषारी मण्यार साप घरात आला व झोपेत असलेल्या पुजाच्या हाताला दंश केला. तिला त्रास होवू लागल्याने कुटुंबीय झोपेतून जागे झाले आणि आजूबाजूला बघितले असता जवळच साप दिसला. त्यानंतर पुजाला तत्काळ बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

जास्त त्रास सुरु झाल्याने तिला पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील डॉ.मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध औषधी तज्ज्ञ डॉ.सदानंद राऊत यांच्याकडे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता माणुसकीची भावना म्हणून पूजावर मोफत उपचार करण्यास सुरुवात केली. तब्बल तेरा दिवस यशस्वी उपचार करुन तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. तत्पूर्वी औषधी व इतर खर्च जास्त असल्याने माळवाडी येथील ग्रामस्थांनी व श्री नाथाबाबा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी या गरीब कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही रक्कम गोळा केली. याकामी विशाल मुसळे आणि पोलीस पाटील संजय जठार यांनी परिश्रम घेतले. एकीकडे डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ तर दुसरीकडे गावकर्यांची आर्थिक मदतीची पराकाष्ठा याबळावर पूजा आता नेहमीप्रमाणे हसूखेळू लागली आहे. त्यामुळे उपचारांचे कोणतेही शुल्क न आकारणारे देवदूत डॉ.सदानंद राऊत यांचा गावकर्यांनी यथोचित सन्मान करुन आभार मानले.

कोविड संकटात डॉक्टरच मुख्य भूमिका निभावत आहे. परंतु, रुग्णांवर उपचार करण्यास न धजणे आणि सर्रासपणे लुटमार करणे असे प्रकार घडत असताना दुसरीकडे सर्पदंशावरील उपचारांसाठी कोणतेही शुल्क न आकारणे ही खरोखरच डॉ.सदानंद राऊत यांची निष्काम सेवा ठरत आहे. त्यामुळे खरोखरच या भयावह संकटात त्यांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे.

