गळ्यातली वरमाला सुकण्यापूर्वीच नवरा मुलगा घटस्फोटीत! आळंदीत लग्न आणि संगमनेरात फटके; मुलीच्या नातेवाईकांचा भरधस्त्यात धुडगूस..


श्याम तिवारी, संगमनेर
प्रेमाच्या चारचाकीला लग्नाच्या फुलांनी सजवून लोणीकडे निघालेल्या एका तरुणाच्या संसाराच्या स्वप्नांना संगमनेरच्या दिल्लीनाका परिसरात असा ब्रेक लागला की, काही तासांपूर्वी नवरदेव म्हणून मिरवणारा तरुण पुढच्या काही तासांतच थेट पोलीस ठाण्यात पीडित म्हणून पोहोचला. नाशिकच्या मुलीने घरच्यांचा विरोध डावलून लोणीच्या तरुणासोबत आळंदी येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर दोघेही लोणीकडे निघाले. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत संगमनेरच्या दिल्लीनाका परिसरात त्यांना गाठले आणि आपले वाहन आडवे लावून नवर्‍यामुलासह त्याच्या वर्‍हाड्यांवर सिनेस्टाईल हल्ला केला. या गदारोळात मुलीच्या बापाने तिला वाहनात बसवून तेथून पलायन केल्याने नवर्‍या मुलाच्या गळ्यातली वरमाला सुकण्यापूर्वीच त्याच्या नशिबी विवाहविच्छेदीताचे जीवन आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून ‘त्या’ मुलीचा जवाबही नोंदवला असून तिने कुटुंबासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने लग्न होवून सासरी पोहोच्यापूर्वीच काडीमोड होण्याचा जगावेगळा प्रकारही या घटनेतून समोर आला आहे.


या प्रकरणी लोणी येथील एका 24 वर्षीय तरुणाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, दंगल घडविणे, सशस्त्र मारहाण करणे तसेच मुलीचे अपहरण करणे आदी कलामान्वये मुलीचे आई-वडील, तीन भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, संबंधित 22 वर्षीय तरुणी लोणीत शिक्षण घेत असताना तिची पीडित तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमसंबंधात झाले. गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांची मान्यता मिळणार नाही, याची दोघांनाही पूर्णकल्पना होती. त्यामुळे मुलीने अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर लागलीच दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.


बुधवारी (ता.5) ठरल्यानुसार दोघेही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आळंदी येथे गेले आणि धार्मिक पद्धतीने नोंदणी विवाह केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आळंदीच्या देवदर्शनानंतर प्रेमकथेचा पुढचा अध्याय लोणीत लिहिला जाईल, अशी त्यांची अपेक्षा असावी. मात्र प्रेमकथेच्या या पुढील भागाचे दिग्दर्शन मुलीच्या कुटुंबीयांनीच आपल्या हाती घेतल्याचे पुढील घटनाक्रमावरुन दिसून आले. विवाहानंतर नवरा मुलगा, त्याची नववधू आणि त्याचे तीन मित्र असे पाचजण त्याच्याच चारचाकी वाहनातून आळंदीहून संगमनेरमार्गे लोणीकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की मुलीचे अख्खे कुटुंब त्यांच्या मागावर आहे. नवर्‍या मुलाचे वर्‍हाड त्याच दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास संगमनेरच्या दिल्लीनाका परिसरात पोहोचताच तिच्या कुटुंबियांनी अगदी सिनेस्टाईल आपले वाहन त्यांच्या वाहनाला आडवे घातले.


सायंकाळची वेळ अन् दिल्लीनाका परिसर म्हणजे वाहनांची आणि माणसांची अक्षरशः गर्दी. या परिसरात त्यावेळी दुचाकीने दोन वाहनांच्या मधून वाट काढणेही अनेकदा कौशल्याचा विषय ठरतो. अशावेळी चारचाकी वाहनाचा पाठलाग, वाहन आडवे लावणे आणि त्यानंतर हाणामारी झाल्याचा प्रकार सुरु झाल्याने परिसरात काहीकाळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. दाखल फिर्यादीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचे वाहन आडवे लावून काही तासांचा नवरा मुलगा आणि त्याच्या तीन मित्रांना मारहाण केली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर, त्यांनी मुलाच्या चारचाकी वाहनाच्या काचाही फोडल्या. हल्लेखोरांकडे लोखंडी रॉड, हॉकीस्टीक आणि दगड असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


या संपूर्ण प्रकारात मुलीच्या वडिलांनी मुलीचा ताबा घेतला आणि तिला आपल्या वाहनात बसवून तेथून रवाना झाले. विशेष म्हणजे मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला घेऊन जाण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. प्रेमाच्या आणाभाका घेत काही तासांपूर्वीच संसाराची मुहूर्तमेढ रोवणार्‍या नवर्‍या मुलाच्या दृष्टीने पुढील काही तास मात्र पूर्णपणे अनपेक्षित ठरले. ज्यांच्यासोबत त्याने संसाराची पहिली पायरी चढली, त्या मित्रांनाच आता फटके चुकवावे लागले. या हल्ल्यानंतर त्याचेे तीन मित्र तेथून पळून गेले आणि नवर्‍या मुलानेही मार चुकवत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले.


या घटनेनंतर त्या तरुणाने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. काही तासांपूर्वी विवाह करुन नवरदेव झालेला तरुण आता पोलिसांसमोर स्वतःवरील हल्ल्याची कहाणी सांगत होता. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनीही तातडीने या प्रकरणातील तरुणीचा शोध घेत नाशिक गाठले. संबंधित तरुणीला जवळच्या पोलीस ठाण्यात बोलावून महिला पोलिस कर्मचार्‍यांमार्फत तिचा जवाब नोंदविण्यात आला. या जवाबात तिने सकाळी विवाह केलेल्या नवर्‍याकडे जाण्यास नकार देत आपल्या आईसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिचा ताबा तिच्या आईकडेच ठेवण्यात आला आहे.


या घटनेने प्रेमविवाहाच्या कथेतला सर्वात मोठा विरोधाभास समोर आणला आहे. लग्न करण्याचा निर्णय दोघांनी मिळून घेतला, आळंदी गाठली, विवाह केला आणि संसाराच्या दिशेने निघाले. मात्र लग्नानंतर अवघ्या काही तासांतच परिस्थिती बदलली. नवरदेवाला पोलीस ठाण्यात फिर्याद द्यावी लागली, तर नववधूने नवर्‍यासोबत जाण्याऐवजी आईसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय चित्रपटांमध्ये प्रेमी युगुल घरातून पळून जाते, पाठलाग करणारे कुटुंबीय मागे लागतात आणि अखेरीस एखाद्या नाट्यमय प्रसंगात सगळे गैरसमज दूर होतात. संगमनेरातील या घटनेने मात्र नेहमीच्या चित्रपटकथेला वेगळे वळण दिले. आळंदीत विवाह झाला असला तरी लोणीचा रस्ता पकडण्याआधीच दिल्लीनाक्यावर कथित मारामारीचा प्रसंग घडला आणि त्यानंतर नववधू पुन्हा माहेरी पोहोचली.

अगदी सिनेस्टाईल पद्धतीने घडलेल्या या घटनेत मुलीच्या आई-वडीलांसह तिची बहिण आणि तिघा भावांनी भररस्त्यात गाडी आडवून नवर्‍या मुलाच्या गळ्यातील वरमाला सुकण्यापूर्वीच त्याला घटस्फोटीताचा दर्जा देवून टाकला आणि भविष्यात त्याच्याकडून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर सशस्त्र हल्ला आणि वाहनाचे नुकसान करुन दहशत निर्माण केली. त्यातच आळंदीत नोंदणी झालेले बहुतेक विवाह ‘बनावट’ संस्थांमध्येच होतात, त्यामुळे तेथून मिळालेली प्रमाणपत्रे कायद्याच्या कसोटीवर टिकत नाहीत. तोच धागा पकडून मुलीच्या कुटुंबियांनी संपूर्ण कुभांड रचले आणि ते तडीसही नेले. पोलिसांनी नाशकात जावून मुलीचा जवाब नोंदवला असता तिने आई-वडीलांसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने ‘त्या’ दोघांमध्ये झालेला विवाह काही तासांचाच ठरण्याची शक्यता आहे, या प्रकरणाने मात्र शहरात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

Visits: 15 Today: 15 Total: 1949272

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *