साईसंस्थानकडून संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करण्याचे आवाहन मंदिर परिसरात सूचनाफलक लावून संस्थानकडून विनंतीवजा सूचना

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थानने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. लॉकडाउननंतर मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णायाची दोन्ही बाजूूंनी चर्चा होत आहे.

देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत. त्यावर म्हटले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.’ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

संस्थानचा कारभार सध्या तदर्थ समितीमार्फत पाहिला जात आहे. संस्थानेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डीतही कपड्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी यापूर्वीच काही भाविकांमधून होत होती. शिर्डीत दूरवरून भाविक येतात. अनेक जण पर्यटनाला यावे, तसे तोकड्या कपड्यांमध्ये येतात. त्याच कपड्यांमध्ये ते दर्शनालाही जातात. ही गोष्ट खटकत असल्याने काही भाविकांची ही मागणी होती. सध्या तरी याची सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ विनंतीवजा सूचना आहे. मात्र, याची अंमलबजावणी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेकडून कशी केली जाते, हेही लवकरच कळेल. सक्ती झाली तर इतर ठिकाणी झाला तसा विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, मंदीर पुन्हा सुरू झाल्यानंतर शिर्डीत पुन्हा भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत लाखावर भाविकांनी शिर्डीत दर्शन घेतले आहे. साईप्रसादही पुन्हा सुरू करण्यात आला असून त्याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीव नियमांचे पालन करूनच दर्शन सुरू आहे. ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिकार्‍यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन साईभक्तांना साईबाबा संस्थानच्यावतीने वारंवार करण्यात येत आहे. त्यात आता कपड्यांच्या नियमाची भर पडणार आहे.

Visits: 49 Today: 1 Total: 255616

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *