प्रवरासंगम येथील निवृत्त शिक्षक कोरडेंनी फुलविली ड्रॅगन फ्रुट शेती
प्रवरासंगम येथील निवृत्त शिक्षक कोरडेंनी फुलविली ड्रॅगन फ्रुट शेती
‘पेन्शन’ देणारे पीक म्हणून ड्रॅगन शेतीकडे वळण्याचे शेतकर्यांना केले आवाहन
नायक वृत्तसेवा, नेवासा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील माजी शिक्षक असलेल्या रामदास कोरडे यांनी धाडसी पाऊल टाकत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे. शेतकर्यांनी आता पेन्शन देणारे पीक म्हणून ड्रॅगन शेतीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उत्पन्न देणारे नवीन पीक म्हणून ड्रॅगन शेतीकडे वळण्याचा निर्णय कोरडे यांनी घेतला. त्यांनी एक एकरामध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. यासाठी लागणारे पाईप व रिंगची उभारणी त्यांनी प्रथम केली. आयुर्वेदिक व औषधी गुणधर्म असलेल्या ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी त्यांनी दोन हजार ड्रॅगन फ्रुटची रोपे एक एकरात लावली. त्यासाठी पाचशे सिमेंट पोल व त्यावर पाचशे सिमेंटरिंग यावर चार रोपे लावत त्यांनी धाडस करत ही लागवड केली आहे.
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रामदास कोरडे म्हणाले, प्रगतिशील शेतकरी म्हणून जेव्हा माझी इस्रायलसाठी निवड झाली. तेथे गेल्यानंतर मला ड्रॅगन शेती टेक्नॉलॉजी फारच भावली. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या ड्रॅगन फ्रुट शेती करण्याचा मी निर्णय घेतला. कमी पाण्यात एकरी अठरा टन उत्पन्न देणारी ही शेती आहे. त्यात या फळाला 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे सध्या बाजारभाव आहे. पाण्याचा निचरा होईल अशीच जमीन ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी निवडली. एक एकरमध्ये ही लागवड केली आहे. त्यासाठी मला आत्तापर्यंत सहा लाख रुपये इतका खर्च लागला. ड्रीपद्वारे सिंचन व्यवस्थापन करत खते व औषधांची मात्राही दिली. दीड वर्षानंतर फळ येते असे सांगितले; पण अकरा महिन्यातच या शेतीत फळ आले. त्यामुळे उसापेक्षा जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे कोरडे यांनी सांगितले.
आज शेतकरी ऊस आणि कांदे लावण्यातच धन्यता मानत शेती करताना दिसत आहे. ऊस व कांद्याचे भाव मागे-पुढे होतात. मात्र ड्रॅगन फ्रुट शेती ही एकरी अठरा टन ड्रॅगन फळ देणारी शेती आहे. आज दीडशे रुपये किलो भाव असल्याने एकरी उत्पन्नाचा विचार करता शेतकर्यांच्या दृष्टीने पेन्शन देणारी ही लागवड असल्याचे कोरडे यांनी आवर्जुन सांगितले. ड्रॅगन फ्रुट हे औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. माणसाचे आरोग्यही यामुळे राखले जाईल याचे समाधानही ही शेती केल्याने मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे उत्पन्न देणारी सुधारित शेती म्हणून ड्रॅगन फ्रुट शेतीकडे शेतकर्यांनी धाडस दाखवून वळावे असे आवाहनही शेवटी कोरडे यांनी केले आहे.
*100 ग्रॅम खाण्यायोग्य फळातील अन्नघटकांचे प्रमाण ः
प्रथिने (0.194), स्निग्ध पदार्थ (0.41 ग्रॅम), (चोथा 8 ग्रॅम), कॅरोटिन (0.0085 मिलीग्रॅम), कॅल्शियम (7.55 मिलीग्रॅम), फॉस्फरस (13.15 मिलीग्रॅम), लोह (0.6 मिलीग्रॅम), जीवनसत्त्व-बी 1(0.1615 मिलीग्रॅम), जीवनसत्त्व -बी 2 (0.044 मिलीग्रॅम), जीवनसत्त्व-बी 3 (0.3635 मिलीग्रॅम), जीवनसत्त्व-क (8.5 मिलीग्रॅम).
*ड्रॅगन फ्रुटचे फायदे : मधुमेह नियंत्रित करते, कोलेस्टेरॉल कमी होण्यास तसेच संधीवात व दमा रोखण्यास मदत करते. जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.