नगर-मनमाड रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करुन मजबूत करा!

नगर-मनमाड रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करुन मजबूत करा!
माजी खासदार प्रसाद तनपुरेंची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींकडे पत्रातून मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा नगर-मनमाड राज्यमार्ग क्रमांक 49 केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 म्हणून घोषित केला आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांची सतत वाहतूक आहे. दरम्यान, वीस वर्षांपूर्वी चौपदरीकरण केलेल्या डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे रस्ता हस्तांतरित करून, सिमेंट काँक्रिटचा मजबूत रस्ता व्हावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


या पत्रात माजी खासदार तनपुरे म्हणाले, केंद्र सरकारने नगर-मनमाड राज्यमार्ग 22 मार्च, 2013 रोजीच्या राजपत्रात राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर त्यात थोडासा बदल करुन, 03 जानेवारी, 2017 रोजीच्या राजपत्रात सिन्नर, सावळीविहीर फाटा, शिर्डी, राहुरी, नगर, दौंड, फलटण, मिरज ते चिकोडी (कर्नाटक) असा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे. परंतु, अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करून घेतला नाही.


केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला सुरत-हैदराबाद ग्रीनफील्ड रस्ता नगर-मनमाड रस्त्याला पर्याय ठरु शकत नाही. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात जवळचा नगर-मनमाड रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांची सतत वाहतूक आहे. राज्य सरकारने सन 2000 मध्ये नगर-मनमाड रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम केले. त्यावेळी रस्त्यावरून 20 टन क्षमतेची वाहने धावत होती. त्यानुसार रस्त्याचे काम झाले. वीस वर्षांत यांत्रिकीकरणात आमुलाग्र बदल झाला आहे. आता शंभर टन क्षमतेची वाहने रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे डांबरी पृष्ठभाग खचून रस्ता फुटत आहे. या रस्त्यावर रोज 34 हजार लहान-मोठी वाहने धावत असतात.


तसेच या रस्त्यावर शिर्डी व शनिशिंगणापूर ही जागतिक कीर्तीचे देवस्थाने आहेत. तेथे येणार्‍या भाविकांसह शिर्डी विमानतळ, कृषी विद्यापीठ, आठ रेल्वे स्थानके, अकरा साखर कारखाने, बाजार समित्या, सहकारी संस्था या वाहतुकीच्या रस्त्यावर आहे. त्यामुळे रात्रंदिवस रस्त्यावर वाहने धावत असतात. मात्र, सध्या रस्ता फुटलेला असल्याने, खड्ड्यांमध्ये वाहने आदळून दररोज अपघात घडत आहेत. तसेच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी नवीन भूसंपादनाची गरज नाही, असेही तनपुरे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 115410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *