नेवासा खुर्दमधील विद्यार्थ्यांचा ‘बालमेळा’ कार्यक्रमात सहभाग शिक्षक राहुल आठरे यांचा पुढाकार; आकाशवाणीवर घुमणार आवाज
नायक वृत्तसेवा, नेवासा
मराठी भाषा गौरव दिनी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन बाल साहित्य संमेलनातील जिल्हा परिषद नेवासा खुर्द मुले शाळेतील सहा विद्यार्थ्यांना आकाशवाणीच्या लहान मुलांसाठी लोकप्रिय असलेल्या ‘बालमेळा’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्राच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीमधील सोहम वाघ (चौथी), शौर्य आठरे (दुसरी), श्लोक मलदोडे (दुसरी), तन्मय शिंदे (तिसरी), राजवीर नलभे (चौथी), प्रांशू मापारी (तिसरी) हे विद्यार्थी बालमेळा कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आकाशवाणीवर सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अण्णासाहेब शिंदे यांनी केले. आकाशवाणीच्या निवेदिका वृषाली पोंदे यांनी ऑडिओ संकलन केले. सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका प्रतिमा राठोड, विद्या खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहभागी बाल साहित्यिकांनी आकाशवाणीवर होणार्या कार्यक्रमासाठी एकपात्री नाटिका, कोरोनावर आधारित जनजागृती कविता, स्वतःच्या भावविश्वातील स्वरचित कविता व आवडलेल्या कवितांचे सादरीकरण केले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या नेवासा खुर्द मुले शाळेतील उपक्रमशील शिक्षक राहुल आठरे यांनी सुरू केलेल्या ‘शाळा बंद तरीही कार्यशाळा सुरू’ या उपक्रमाच्या माध्यमातून आज अखेर राज्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या कृतियुक्त शिक्षण व कलेला वाव देण्यासाठी गणित, कला, कार्यानुभव अशा विविध विषयांच्या सहा कार्यशाळा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. सादरीकरण केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रसार भारतीचे प्रमुख बाबासाहेब खराडे यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रसारण न्यूज ऑन एअर या अॅपवरून आणि आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या 101.1 मेगाहर्ट्सवरून रविवारी 21 मार्च व 4 एप्रिल यादिवशी दोन भागात सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी होणार आहे.
या सहभागी विद्यार्थ्यांचे सभापती रावसाहेब कांगुणे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, अधीक्षक हेमलता गलांडे, विस्तार अधिकरी शिवाजी कराड, केंद्रप्रमुख मीरा केदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सारिका बल्लाळ, सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, मुख्याध्यापिका शकीला खान, अरविंद घोडके, साईनाथ वडते, प्रतिभा पालकर, छाया वाघमोडे, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर, मीनाक्षी लोळगे, ज्योती गाडेकर आदिंनी अभिनंदन केले आहे.
‘जिल्हा परिषदेच्या शाळा बंद तरीही कार्यशाळा सुरू…’ या नेवासा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी ऑनलाईन एकत्र येत राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यामधून अहमदनगर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना ‘बालमेळा’ या आकाशवाणी केंद्रावर व्यक्त होण्याची संधी मिळाली. या सर्व बाल साहित्यिक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन.
– शिवाजी शिंदे (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर)