पीएम किसान सन्मान योजना : अहमदनगर जिल्ह्याने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार! जिल्ह्यातील सर्वाधीक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात संगमनेर तालुका ठरला अव्वलस्थानी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल अहमदनगर जिल्ह्याला ‘भौतिक तपासणी’ या संवर्गात प्रथम क्रमांचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बुधवारी (ता.24) केंद्रीय कृषीमंत्री नरेंदसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले या पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेत जिल्ह्यातील चौदा तालुक्यात सर्वाधीक लाभार्थ्यांची नोंदणी व त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना असून सन 2019 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार विहित कालावधीत या योजनेची कार्यवाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्या दिशानिर्देशात झाली होती. कुळकायदा शाखेचे तत्कालीन तहसीलदार फसियुद्दिन शे, शरद घोरपडे यांच्या नियोजनात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचरी यांच्यातील समन्वयाची पायाभरणी झाली. नंतरच्या काळात जिल्हाधिकारी राजेंद्र भासेले यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे पथदर्शी काम झाले.
या योजनेतंर्गत संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक 72 हजार 513 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 68 हजार 713 खातेदारांना आजवर सात हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. या योजनेतंर्गत संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांच्या खात्यात एकूण 77 कोटी 72 लाख 68 हजार रुपयांचा जिल्ह्यातील सर्वाधीक सन्मान निधीही जमा झाला आहे. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्या दिशानिर्देशात संगमनेर तालुक्यात या योजनेचे काम तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, संबंधित काम पाहणारे अव्वल कारकून, सर्व मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व कृषी मंडलाधिकारी यांनी टीमवर्क केल्याने जिल्ह्यात संगमनेर तालुका अव्वल ठरला आहे.
या योजनेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्ताने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या जिल्ह्यांचा सन्मान होत आहे. यात भौतिक तपासणी वर्गवारीत नगर जिल्ह्यास राष्ट्रीय पातळीवरील पहिला क्रमांक घोषीत झाला आहे. नोव्हेंबरमध्ये नगर जिल्ह्यातील 28 हजार 802 खाती भौतिक तपासणीसाठी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम जिल्हा प्रशासनाने जलदगतीने पूर्ण केले. त्याची राष्ट्रीय दखल घेण्यात आली असून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांना दिल्लीचे निमंत्रण प्राप्त झाले असून बुधवारी (ता.24) शानदार समारंभात केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान योजना आणि जिल्हा..
जिल्ह्यातील एकूण नोंदणी : 6 लाख 97 हजार 920
संगमनेर तालुक्यातील नोंदणी : 72 हजार 513
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : 6 लाख 60 हजार 174
संगमनेर तालुक्यातील लाभार्थी : 68 हजार 713
प्राप्त हप्त्यांची संख्या : 7
जिल्ह्याला प्राप्त झालेली एकूण रक्कम : 719 कोटी 58 लाख 70 हजार
संगमनेर तालुक्याला प्राप्त रक्कम : 77 कोटी 72 लाख 68 हजार