साहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय? केळेवाडी येथील द्राक्ष उत्पादकाने मांडली व्यथा
नायक वृत्तसेवा, घारगाव
द्राक्षे काढणीसाठी आलेली असताना पुन्हा निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे साहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय? अशी व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी येथील द्राक्ष उत्पादक राजेंद्र पाडेकर यांनी मांडली आहे.
केळेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाडेकर यांची गेल्या दहा-बारा वर्षांपासून एक एकर शेतात द्राक्षाची बाग आहे. उच्चतम गुणवत्ता असल्याने दरवर्षी त्यांची द्राक्षे निर्यात होतात. त्या माध्यमातून चांगले पैसेही मिळत असत. मात्र यंदा द्राक्षे निर्यात होतील अशी अपेक्षा पाडेकर असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्यात बंदी करण्यात आली आहे. सध्या पाडेकर यांची सोन्यासारखी द्राक्षे काढणीसाठी आली आहे. मात्र निर्यात बंद असल्याने पाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे.
यंदाच्या हंगामासाठी जवळपास दोन लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे. परंतु निर्यात बंदीमुळे काय करावे असा प्रश्न उत्पादक पाडेकर यांच्या पुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षीही कोरोनाचे संकट होते. आता पुन्हा कोरोनाचे संकट आल्याने शेतकर्यांची ‘न घर का, न घाट का’ अशी दयनीय अवस्था झाली आहे. द्राक्षे खरेदी करणार्या व्यापार्यांशी संपर्कही साधला होता. मात्र, निर्यात बंदी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या द्राक्षांची विक्री स्थानिक आठवडे बाजारांमध्ये करावी लागणार आहे. त्यामुळे ‘साहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय?’ अशी हलबलता द्राक्ष उत्पादक राजेंद्र पाडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे मांडली आहे.