मुळाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुटले आवर्तनातून तीस हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सोमवारी (ता.15) सकाळी सहा वाजता उन्हाळी हंगामातील सिंचनासाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. 707 क्यूसेकने सोडलेले हे आवर्तन टप्प्याटप्प्याने 1500 क्यूसेकपर्यंत वाढविले जाईल, अशी माहिती मुळा धरणाचे शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.
मुळा धरणात आज अखेर 20 हजार 450 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अचल साठा वगळता 15 हजार 950 दशलक्ष घनफूट पाणी धरणात उपलब्ध आहे. उजव्या कालव्याद्वारे राहुरी, पाथर्डी, नेवासा व शेवगाव तालुक्यांतील तीस हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे आवर्तन सोडण्यात आले. चाळीस दिवस चालणार्या या आवर्तनासाठी 4500 दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल.
वांबोरी उपसा पाणी योजनेसाठी 15 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू आहे. ते शंभर दिवस चालेल. त्यासाठी 680 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यांतील 101 गाव तलाव त्यातून भरून घेण्यात येणार आहेत. पाणीपट्टी जमा करणार्या गावांतील तलावांत पाणी सोडण्यास प्राधान्य देण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने ठेवले आहे. त्यामुळे, आतापर्यंत 42 तलावांमध्ये पाणी पोहोचले आहे, असेही आंधळे यांनी सांगितले.
दोन्ही कालव्यांसाठी पाच आवर्तने
डाव्या कालव्यांतून शुक्रवारपासून (ता.5) सोडलेले आवर्तन 26 मार्चपर्यंत चालेल. त्यातून राहुरी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या आवर्तनासाठी पाचशे दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल. उन्हाळी हंगामातील सिंचनाचे उजव्या कालव्याद्वारे दोन; तर डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत.