जळीतग्रस्त कुटुंबांना ‘आधार’कडून मदतीचा हात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी (ता.14) दुपारी दोन वाजेच्या सुमारास समनापूरमध्ये कामगारांच्या स्थिरावलेल्या एका झोपडीला आग लागली. त्यानंतर आगीने रौद्र रुप धारण केल्याने तीन झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. यामध्ये सर्व संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्याने त्यांना संगमनेरातील आधार फौंडेशनने जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. याबद्दल फौंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर घटनेची माहिती कामगार तलाठी संतोष लंके व संजय शितोळे यांनी आधार फौंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे व बाळासाहेब पिंगळे यांना दिली. त्यानंतर प्राध्यापक चं. का. देशमुख यांच्या श्री संत गाडगेबाबा भानूप्रभाकार सेवा प्रतिष्ठान व आधार फौंडेशनच्या माध्यमातून जळीत परिस्थितीचा आढावा घेतला. आधारचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे, सोमनाथ मदने, अनिल कडलग, विठ्ठल कडूसकर, लक्ष्मण कोते यांनी तत्परतेने महसूल विभागाच्या सहकार्याने मदत साहित्यांचे नियोजन केले. यामध्ये भांडी, किराणा, धान्य, सतरंजी, चादर आदी साहित्य देण्यात आले. यावेळी तहसीलदार अमोल निकम यांनी संवेदनशीलता जपत जळीतग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करुन चार हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तर श्री संत गाडगेबाबा भानूप्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख यांनी तिन्ही कुटुंबास सहा हजार रुपयांची भांडी देत मौलिक आधार दिला. तसेच कामगार तलाठी शितोळे व लंके यांनी आधार फौंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना तीन हजार रुपयांच्या सतरंजी, चादर आदी कपडे दिले. याप्रसंगी समनापूरचे मंडलाधिकारी बाबासाहेब जाधव, आधारचे शिलेदार निवृत्ती शिर्के, उत्तम देशमुख, एकनाथ साबळे, पोलीस पाटील गणेश शेरमाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ शेरमाळे, भास्कर शेरमाळे व आधारचे समन्वयक पी. डी. सोनवणे उपस्थित होते.