कनोलीमध्ये भावकीतील महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! तिघांविरोधात गुन्हा दाखल; जमीन न मिळाल्याच्या रागातून घडली घटना
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण खरेदी करू इच्छित असलेली जमीन इतरांना विकली हा राग मनात असतानाच आपल्या घरासमोरील सरपण तोडत असलेल्या भावकीतील महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. मुले मदतीला धावल्याने महिलेचा जीव वाचला खरा; पण ती 60 टक्के भाजली आहे. संगमनेर तालुक्यातील मनोली गावात ही घटना घडली. पेटवून देणार्या दोघी महिलाच होत्या. त्यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोली गावातील खंडोबा मंदिराजवळ राहणार्या अर्चना सदाशिव उर्फ दत्तू शिंदे (वय 24) यांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. तिला पेटवून देणार्या आकांक्षा शंकर शिंदे आणि हरणबाई नाना शिंदे, तर फोनवरून शिवीगाळ करणार्या शंकर शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी आकांक्षा शिंदे ही जखमी अर्चना यांची जाऊ आहे, तर हरणबाई शिंदे अर्चनाची चुलत सासू तर शंकर शिंदे दीर आहे. त्यादिवशी अर्चना घराजवळ असणार्या खंडोबा मंदिराजवळ सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा जाऊ आकांक्षा हिने ते सरपण आमचे असून घेऊ नको, असे धमकावले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. आकाक्षांने पती शंकर याला फोन लावून दिला, तो परभणीत होता. त्यानेही अर्चना यांना फोनवरून शिव्या दिल्या. सरपण हवे असेल तर पैसे दे आणि मग घेऊन जा, असेही त्याने सांगितले. स्पीकर फोनवरून भांडणाचा संवाद सुरू होता. अर्चना ऐकत नाही, असे लक्षात आल्यावर आकांक्षाने फोन कट केला आणि सरळ मारहाण करायला सुरुवात केली. तेथे पडलेली कुर्हाड घेऊन त्याच्या दांड्याने अर्चनाला मारहाण केली.
त्या दोघींमध्ये सुरू झालेली तुंबळ हाणामारी पाहून चुलत सासू हरणाबाई तेथे धावत गेली. हिची कायमची कटकट मिटवून टाक असे सांगून तिने अर्चना यांचे हात धरले. आकांक्षाने घरात जाऊन डिझेलचा डबा व काडीपेटी आणली. रागाच्या भरात अर्चनाच्या अंगावर डिझेल ओतून पेटवूनही दिले. अंगावरील कपड्यांनी तत्काळ पेट घेतल्याने आर्चनाही जोरजोरात ओरडू केली. तेव्हा तिची मुले आणि अन्य ग्रामस्थ मदतीला आले. त्यांनी भांड्यांतून पाणी आणून आग विझवली. अर्चना यांचे पती सेंट्रींगचे काम करतात. त्यांनाही बोलावून घेण्यात आले आणि अर्चना यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेला आणखी एक पार्श्वभूमी असल्याची माहिती पुढे आली. शंकर याच्यावर वैद्यकीय उपचारांसाठी मोठी रक्कम हवी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या वाट्याची जमीन विकली. ती जमीन त्यांचा भाऊ घेऊ इच्छित होता. मात्र, अन्य एका ग्राहकाने जास्त पैशांची बोली लावल्याने त्याला विकण्यात आली. ती जमीन न मिळाल्याचा राग आकांक्षा आणि तिच्या पतीला होता. त्यात सरपणाचे निमित्त झाले आणि ही घटना घडली, असे सांगण्यात आले.