शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा ः थोरात जिल्हा काँग्रेस समितीच्या ऑनलाईन बैठकीत तालुकानिहाय आढावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस पक्षाने कायम गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करताना शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा कोरोना परिस्थिती, बी-बियाणे उपलब्धता, वाटप व इतर प्रश्नांचा आढावा घेतला.

जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र नागवडे, करण ससाणे, सचिन गुजर, उत्कर्षा रुपवते, शहराध्यक्ष किरण काळे, सुरेश थोरात, मधुकर नवले, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, नासीर शेख, अरुण नाईक, बाबासाहेब ओहोळ, ज्ञानेश्वर मुटकुळे, सचिन चौगुले, शिवाजी नेहे, किरण पाटील, बाळासाहेब आढाव, तुषार पोटे, दीपक भोसले, संभाजी रोहोकले, अ‍ॅड.कैलास शेवाळे, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, अमोल फडके, कार्लोस साठे आदिंसह जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन मंत्री थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसने कायम सर्वसामान्य व गोरगरिबांच्या हिताचे राजकारण केले आहे. हा पक्ष लोकशाही मानणारा व राज्यघटनेचा विचार जपणारा पक्ष आहे. देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसचा मोठा त्याग असून या पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी संघटनात्मक वाढ अधिक होणे गरजेची आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असून शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना दुवा म्हणून आपण काम करावे. कोरोनाच्या संकटात सर्व तालुक्यातील पदाधिकारी, युवा कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करुन रुग्णांना मोठी मदत केली आहे. रुग्णवाहिका सुविधा दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अशाकामी स्वयंसेवकांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे. कोणत्याही संकटाचा सामना हा संघटना मजबूत असेल तर चांगल्या पद्धतीने करता येतो. आगामी काळामध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करताना देशात काँग्रेसला बळकटी देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आह. खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्‍यांच्या बी-बियाणांसाठी होणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी व आपले गाव आपला तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यातील विविध सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 198 Today: 2 Total: 2122805

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *